Marathi News

‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांनी गायलेले ‘चंद्रमुखी’ गाणे झाले लाँच !

 

प्रविण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांचा ‘चंद्रमुखी’ ह्या धमाल हळदीच्या गाण्याने संगीतक्षेत्रात डेब्यू झाला आहे. अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका यादव ह्या कलाकारांनी संगीतकार सुकूमार दत्ता ह्यांनी संगीतबध्द केलेले ‘चंद्रमुखी’ हे गाणे गायले आहे.

सिनेमाचे निर्माते विनोदकुमार जैन गाण्याविषयी सांगतात, “सागर खेडेकर ह्यांनी लिहीलेल्या गीताला सुकूमार दत्तांनी उडत्या चालीत इतके चपखलपणे बसवले आहे की, गाणे पटकन ओठांवर रूळते. आम्ही चित्रीकरणादरम्यान हे गाणे सतत गुणगुणत होतो. आणि मला पूर्ण विश्वास आहे, की सिनेरसिकांनाही हे गाणे खूप आवडेल.”

ह्या गाण्याविषयी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणतात, “ ह्या अगोदर सगे-सोयरे आणि कळत-नकळत सिनेमांमधून मी गाणे गायले आहे. त्यामूळे हे गाणे रेकॉर्ड होताना त्या गाण्यांचा रेकॉर्डिंगचा अनुभव गाठीशी होताच, शिवाय हे हळदीचे गाणे असले तरी मिश्किल बाजाचे असल्याने ते आमच्या आवाजात शोभते आहे.”

अनिकेत विश्वासराव म्हणाला, “माझा सिनेसृष्टीत प्रवेश अशोकमामांसोबतच्या सिनेमामधून झाला. आणि आता पार्श्वगायनात डेब्यू होतानाचे गाणेही अशोक मामांसोबतच आहे. त्यामूळे मी स्वत:ला लकी समजतो.”

पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तूत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे ह्यांची निर्मिती असलेला, सचिन संत ह्यांची सहनिर्मिती असलेला  प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ ह्यांच्या अभिनयाने सजलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट 5 ऑक्टोबर 2018ला रिलीज होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button