Marathi News
सुबोध – श्रुतीचे रॉमेंटीक सॉंग लाँँच
पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित ‘शुभ लग्न सावधान’ हा सिनेमा येत्या १२ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर रॉमेंटीक गाणे लाँच करण्यात आले. ‘हे वेड आहेस तू’ असे या गाण्याचे बोल असून, सुबोध आणि श्रुतीची लव्हकेमिस्ट्री यात पाहायला मिळते. तसेच, या गाण्यात दुबईचे बुर्ज अल अरब हे सप्ततारांकित हॉटेल आपल्याला दिसून येत असून, तेथील गगनचुंबी इमारती पाहणाऱ्यांचे डोळे दिपवून टाकतात.
प्रेमीजोडप्यांना आकर्षित करणारे हे गाणे मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे. शिवाय, चिनार आणि महेश यांचे संगीत असलेल्या या गाण्याला हर्षवर्धन वावरे आणि अपेक्षा दांडेकर यांचा गोड आवाज लाभला असल्याकारणामुळे हे गाणे ‘वेड’ लावून जाते.
विवाहसंस्थेवर भाष्य करणारा हा अस्सल कौटुंबिक सिनेमा असून, यात डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये यांचीदेखील महत्वपूर्ण भूमिका आहे. दुबईत आणि इगतपुरीत चित्रिकरण झालेल्या या सिनेमासाठी अरुंधती दाते, श्रीनिवास जांभेकर, विद्या संदीप तुंगारे व तुषार कर्णिक यांनी निर्मिती सहाय्य केले आहे.