संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर माधुरीने दिले चाहत्यांना खास तिळगूळ
आपल्या दिलखुलास हास्याने कित्येक कळ्या खुलवणारी माधुरी आता मराठी सिनेसृष्टीत झळकणार ही बातमी पसरली आणि या चित्रपटाच्या नावाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. चाहत्यांची ही उत्सुकता जास्त ताणून न धरता अखेर मकरसंक्रांतीचं औचित्य साधत, महाराष्ट्राच्या लाडक्या धकधक गर्लने आपल्या पहिल्या – वहिल्या मराठी चित्रपटाचं नाव ट्विटरवर घोषित केलं आहे. ‘बकेट लिस्ट’ असं या चित्रपटाचं नाव असून यानिमित्ताने लाँच करण्यात आलेल्या टाटयल टीझर पोस्टरवरील माधुरीतला मराठमोळेपणा तिच्या चाहत्यांच्या ह्रदयाचा ठोका चुकवण्यात यशस्वी होतो आहे.
गृहिणी, आई, मैत्रीण, बहिण, मुलगी अशा कैक भूमिका एकाचवेळी पार पाडत असलेल्या स्त्रियांचं प्रतिनिधीत्त्व करणारं हे व्यक्तिमत्त्व माधुरीच्या रूपात बकेट लिस्टच्यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टायटल टीझर पोस्टरमधून दिसत आहे. या सगळ्याच भूमिकांमध्ये अग्रेसर असणारी ही गृहिणी आपल्या वेगळेपणातून प्रेक्षकांची करमणुक करणार असल्याचा विश्वास दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊसकर यांनी केला आहे.
डार्क हॉर्स सिनेमा, दार मोशन पिक्चर्स तसेच ब्लु मस्टँग क्रिएशन्स यांनी या चित्रपटाची निर्मिती करून ही मराठमोळी माधुरी प्रेक्षकांसमोर आणली आहे. तर दिग्दर्शनाबरोबरच चित्रपटाची कथा, तेजय प्रभा विजय देऊसकर यांची आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबईत सुरूवात झाली आहे.
गेली तीन दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी माधुरी आपल्या मातृभाषेत कधी सिनेमा करणार असा प्रश्न कित्येक चाहत्यांच्या मनात होता, अखेर या प्रश्नाचं उत्तर घेऊन माधुरी बकेट लिस्टच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटाच्या कथेविषयी बोलताना, “हा चित्रपट मराठी असला तरी चित्रपटाची कथा युनिव्हर्सल असल्याचं, चित्रपटाचे निर्माते म्हणाले. तर हिंदी सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केल्यापासून चांगल्या मराठी संहितेच्या शोधात असणारी माधुरी कथा ऐकताक्षणी या चित्रपटाच्या कथेच्या प्रेमात पडली आणि क्षणार्धात चित्रपटाला होकार कळवल्याचं म्हणाली.”
माधुरीचा हा मराठमोळा अवतार येत्या उन्हाळ्यात प्रेक्षकांना गारवा देऊन जाणारा ठरणार आहे. सुट्टीच्या दिवसांत प्रदर्शित होणारा ‘बकेट लिस्ट’ हा सिनेमा प्रेक्षकांना हसता हसता प्रेरणा देऊन जाईल, अशी आशा माधुरीने व्यक्त केली आहे.