व्हॅलेंटाईनच्या महिन्यात सावनी रविंद्रची चाहत्यांसाठी ‘रोमँटिक’ तमिळ सुरेल भेट !!!
व्हॅलेंटाइन्सच्या प्रेमळ महिन्यात सावनी रविंद्रने आपल्या चाहत्यांना एक सुरेल रोमँटिक गीताची भेट दिली आहे. ‘नान सोल्लव्वा’ ह्या तमिळ शब्दांचा अर्थ ‘तूला एक सांगू का’ असा आहे. सतिशकांत ने लिहिलेल्या ह्या रोमँटिक गीताला शुभंकर शेंबेकरने संगीत दिले आहे. आणि सावनी रविंद्रसोबत गायलेही आहे. ‘सावनी ओरिजनल्स’ सीरिजमधले हे पहिले गाणे आहे.
सावनी रविंद्रने तमिळभाषी सिनेमांसाठी अनेक गाणी गायली आहेत. ‘ईमाई’, ‘कुटाल’ हे तिचे गाजलेले सिनेमे आहेत. ‘वेनिलाविन सलाईगल्ली’ ‘कत्रिल इधगळ’,’उईरे उईरे’ सिंगल्स सुध्दा प्रसिध्द आहेत. ‘नान सोल्लव्वा’ विषयी सावनी रविंद्र सांगते, “दक्षिणेमध्ये माझे बरेच चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून तमिळभाषी चाहत्यांकडून सतत मला एखादं ओरिजनल साँग गाण्याची फर्माइश होत होती. ती इच्छा मी ह्या रोमँटिक गाण्याने पूर्ण केली आहे. मुख्य म्हणजे ह्या गाण्याचे संगीत नियोजन चैन्नईमधल्या म्युझिशियननी केल्याने गाणं खूप अस्सल तमिळ मातीतलं वाटतंय. चित्रीकरणही गाण्याला साजेसेच करण्यात आलंय. तमिळ आणि मराठी कानसेनांच्या गाण्यांविषयीच्या आवडींमध्ये साम्य असतं असं मला वाटतं. त्यामूळे हे सुमधूर गीत मराठी रसिकांनाही आवडेल असा मला विश्वास आहे. “
‘सावनी ओरिजनल्स’विषयी सावनी रविंद्र सांगते, “सूरांना भाषेचे बंधन नसते. सावनी अनप्लग्डला रसिकांनी खूप छान प्रतिसाद दिला. तो पाहून यंदाच्या वर्षीचा माझा संकल्प आहे की, यंदा मी ओरिजनल गाणी घेऊन येणार आहे. तमिळनंतर बंगाली, पंजाबी, नेपाळी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये सावनी ओरिजनल्स घेऊन येण्याचा मानस आहे.”