पुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित.
मराठीतील कलरफुल अभिनेत्री पुजा सावंतचा ‘लपाछपी’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील घेतली असून, तिच्या अभिनयकौशल्याला चारचाँद लावणाऱ्या या पुरस्कारांच्या यादीत आणखीन एक मानाचा पुरस्कार सामील होणार आहे. भारतीय चित्रपटाचे जनक दादा साहेब फाळके यांच्या १४९व्या जयंतीप्रित्यर्थ स्माईल फाउंडेशनद्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी पुजाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नावाजण्यात येणार आहे. येत्या २१ एप्रिल रोजी वांद्रे येथील सेंट अॅड्रयूज ऑडीटोरियममध्ये पुजाला हा पुरस्कार प्रधान करण्यात येईल.
स्माईल फाउंडेशन अखत्यारीत देण्यात येणारा हा पुरस्कार दादासाहेब फाळके यांच्या कुटुंबियांकडून चित्रपटसृष्टीतील यशस्वी कलाकारांना त्यांच्या कामगिरीसाठी देण्यात येतो. त्यानुसार यावर्षीचा हा मान ‘लपाछपी’ सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुजाला मिळाला.