संगीतकार व गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांचा अभिनय, कथा यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या बॉक्स ऑफिसवर पहायला मिळत आहे. प्री-वेडिंगच्या ट्रेंडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाची हाताळणी लोकांच्या पसंतीस पडत आहे.
मराठी चित्रपटप्रेमींसाठी यापेक्षा जास्त आनंदाची आणि अभिमानाची बातमी म्हणजे ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे तर आता परदेशातही प्रदर्शित करण्यात आला आहे. अमेरिका, इंग्लंड, दुबई, बेहरीन, जर्मनी, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये या चित्रपटाचे शो दाखविण्यात येत आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबीने केली आहे.
हलक्या-फुलक्या अंगाने फुलत जाणारा हा एक पारिवारिक चित्रपट आहे. महानगरांमध्ये व मोठ्या शहरांमध्ये परस्पर नात्यांकडे कसे पहिले जाते आणि त्या तुलनेत छोट्या शहरांमध्ये त्याचे काय महत्व असते, याचा उलगडा या प्री-वेडिंग चित्रपटातून करण्यात आला आहे. गेली काही वर्षे ‘प्री-वेडिंग शूट’ची लाट आली आहे. लग्न ठरल्यानंतर एक मोठी फिल्म बनवली जाते. हे प्री-वेडिंग शूट करत असताना मुलभूत तत्वे आणि भावना व त्यातून येणारा जिव्हाळा, त्याग, प्रेम आणि ममत्व या गोष्टी सर्वत्र सारख्याच असतात हे यात दाखविण्यात आले असून हे सर्व पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.
‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये अनेक कसदार अभिनेते आहेत. त्यामध्ये आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वे, शिवाजी साटम, अलका कुबल, कॉमेडीचा बादशहा भाऊ कदम आणि लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, सुनील बर्वे यांच्याबरोबर अश्विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे,शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार हे कलाकारसुद्धा आहेत. या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली असून पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर सलील कुलकर्णी यांनी स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट पाहताना येत आहे.
‘सिनेरसिकांचे मी प्रथम आभार मानतो, त्यांच्या प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे मी इथपर्यंत मजल मारली आहे’ अशी भावना दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणतात की ‘मी पहिल्यांदाच दिग्दर्शित केलेल्या माझ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. याचे मला खूप समाधान वाटत आहे. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. मला वाटते की चित्रपटाची कथा आजची असावी. तसेच प्रत्येकाला रुचेल आणि पटेल अशी असावी, याकडे माझा जास्त कल होता. स्वप्नाळू किंवा काहीतरी भयंकर करण्यापेक्षा आपल्यासारख्या माणसांमध्ये, घरांमध्ये घडणा-या गोष्टी पाहणे, यात खरी मजा आहे. आणि तेच मी यामध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला आहे’.
मुक्ता बर्वे म्हणाली की ‘‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाची कथा ही मजेशीर व आणि हलकीफुलकी आहे. मराठीत अशाप्रकारचा वेगळा बाज क्वचितच हाताळला गेला आहे. यातील माझी दिग्दर्शिकेची भूमिका खूपच वेगळी असून त्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे, याचा मला खरच आनंद झाला आहे.