मराठी रंगभूमीचे सुप्रसिद्ध दिवंगत लेखक आणि अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या तृप्ती तोरडमल लवकरच एका चित्रपटातून मराठीसिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ असे या चित्रपटाचे नाव असून, याची निर्मिती बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम करत आहे. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केले आहे. या सिनेमातील ‘सविता’ या महत्वपूर्ण पात्राच्या भूमिकेतून तृप्ती लोकांसमोर येणार आहे. यापूर्वी, एका प्रसिध्द नाटकाद्वारे दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांनी हे पात्र लोकांसमोर सादर केले होते. त्यामुळे, सिनेमाच्या पडद्यावर सविता साकारण्याचे मोठे आव्हान तृप्तीवर आहे. या सिनेमातील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना तृप्ती सांगते कि, ‘हा सिनेमा करताना, मला माझे बाबा मधुकर तोरडमल यांच्या नावाला आणि रीमाजींनी एकेकाळी गाजवलेल्या या भूमिकेला धक्का लावू द्यायचा नव्हता. त्यामुळे, माझ्या अभिनयातले वेगळेपण मला जपायचे होते. त्यासाठी मला स्वप्ना वाघमारे जोशी आणि जॉन अब्राहम यांचे मोठे पाठबळ मिळाले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मला हे पात्र साकारण सोपं गेलं’.
या सिनेमासाठी तृप्तीने वास्तविक घटनेचा अभ्यास करत, आपल्या अभिनयात प्राण ओतण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. सिनेमाच्या कथानकाची गरज ओळखून तिने तिच्या आवाजावर अनेक प्रयोग केले. त्यासाठी कोणत्याही तांत्रिक साधनाचा वापर न करता, रात्रंदिवस आपल्या आवाजात फेरबदल करण्याचा तिने महिनाभर सराव केला. त्यापैकी एक आवाज तिने तिच्या बाबांना ऐकवला असता त्यांना तो आवडला. खऱ्या आयुष्यातील सविताचे निकटवर्तीय शेखर ताम्हाणे यांनादेखील तो आवाज ऐकवला असता, सविताचा आवाज अगदी असाच होता, अशी पोचपावती त्यांनी दिली. त्यांच्या या सकारात्मक उत्तराने माझ्या मेहनतीचे चीज झाले असल्याचे तृप्ती सांगते.
रंगभूमीची योग्य जाण असलेल्या तृप्तीचा हा पहिलाच सिनेमा असून, तिच्या अभिनय कारकिर्दीला तो चारचाँद लावणारा ठरेल, अशी आशा आहे.