स्त्री’ या शब्दाला समाजात मोठं वलय आहे. आई, मुलगी, बहिण, मैत्रीण आणि बायको असे विविध नात्यांमध्ये बंधलेली भावनिक व्यक्ती म्हणजे ‘स्त्री’ ! बदलत्या समाज आणि परिस्थितीनुरूप ‘स्त्री’ ची व्याख्या देखील बदलत गेली, कालांतराने आधुनिक युगात ‘स्त्री’ या शब्दाचा अर्थदेखील विकसित झाला. आजची ही स्त्री बहुगुणी आहे, चूल आणि मुल यांसोबतच तिच्या विश्वात अनेक गोष्टींचा समावेश झाला आहे. तिच्या याच विश्वाचा वेध लवकरच माय एफएमच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. मराठीच्या स्टार अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.
आजच्या स्त्रीच्या संकल्पना, विचार तसेच त्यांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मुक्ता ‘द मुक्ता बर्वे शो’ या कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देणार आहे. आतापर्यत अभिनयात विशेष वेगळेपण जपणारी मुक्ता आता रेडियोजॉकीच्या रुपात तिच्या चाहत्यांसमोर येत आहे. विशेष म्हणजे एका सेलिब्रिटीद्वारे जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्याचा हा पहिलाच प्रयोग माय एफ एम रेडियो वाहिनीमार्फत राबविला जात आहे. दर सोमवार ते शनिवार दुपारी १२ वाजता मुक्ताच्या आवाजातला हा शो पश्चिम महाराष्ट्रात सुरु होत आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे या कार्यक्रमाला चांगला न्याय देऊ शकेल असा विश्वास माय एफएम ला असून, हा कार्यक्रम स्त्री विकासावर आधारित असल्याचे ते सांगतात. शिवाय हा योग जुळवून आणणारे जीसिम्स्चे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बरान हे देखील या शोसाठी उत्सुक आहे. ‘एफएम मधून हा आगळावेगळा उपक्रम आम्ही राबवीत असून, यातून स्त्री विकासाचे अनेक पैलू मांडले जातील’ असे त्यांनी सांगितले.
गंभीर आणि सामाजिक विषयावर आधारित अनेक चित्रपटातून नावारूपास आलेली मुक्त बर्वे आज यशाच्या उंचीवर आहे, आपल्या भूमिकेतून स्त्री विषयपर अनेक समस्यांना वाचा फोडणारी हि अभिनेत्री प्रथमच एमएमच्या माध्यमातून जनसामान्यांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे श्रोते तिचा आवाज ऐकण्यास नक्कीच आतुर झाले असतील, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. स्त्री मानसिकतेचा अचूक वेध घेण्यास सज्ज असलेली मुक्ता या कार्यक्रमात काय कसब दाखवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.