‘स्माईल प्लीज’चे ‘अनोळखी’ गाणे प्रदर्शित

विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘स्माईल प्लीज’ या सिनेमाचे ‘अनोळखी’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर  प्रदर्शित करण्यात आले आहे. मुक्ता बर्वेवर चित्रित झालेले आणि सुनिधी चौहान यांनी गायलेले हे गाणे  म्हणजे मनातल्या कलहाचे एक समर्पक चित्रण आहे. आयुष्यात अनपेक्षितपणे येणाऱ्या संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करत असताना अनेकदा आपण हताश आणि एकटे पडतो. तेव्हा आपण स्वतःशीच अनोळखी होतो आणि चालू होतो स्वतःचा स्वतःशी प्रश्न उत्तरांचा खेळ. या गाण्यातून आलेल्या परिस्थितीवर अगदी समर्पक शब्दांत मनात येणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या गाण्यात मुक्ता स्वतःचा नवीन स्वरूपात शोध घेण्यासाठी आटापिटा करत आहे.  एका आशेच्या किरणाची वाट बघत असताना हे गाणे चित्रित झाले आहे. ‘अनोळखी’ हे गाणं रोहन – रोहन यांनी संगीतबद्ध केले असून सुनिधी चौहान यांनी स्वरबद्ध केले आहे.
या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर यांच्या प्रमुख भूमिका असून तृप्ती खामकर, सतीश आळेकर सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसतील. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट आपल्याला स्वतःचा नव्याने शोध घेण्यासाठी प्रेरणा देणारा असेल. येत्या १९ जुलै रोजी ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

Exit mobile version