जगण्याची नवी दिशा देणाऱ्या ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटाची मेलबर्न येथे होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये अधिकृत निवड झाली आहे. ‘स्माईल प्लीज’ चित्रपटासाठी हा एक सन्मानच आहे. जगण्याला आणि स्वप्नांना खऱ्या अर्थाने नवीन परिभाषा देणारा हा चित्रपट नक्कीच सर्वांसाठी प्रेरणास्रोत ठरणार आहे. आता तर मानाच्या समजल्या जाणारा आणि मेलबर्न मध्ये संपन्न होणाऱ्या ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये या चित्रपटाची अधिकृत निवड झाली आहे. या फेस्टिवल मध्ये अनेक उत्कृष्ट दर्जाच्या, उत्तम आणि आगळेवेगळे विषय, कथानक असणाऱ्या चित्रपटांची निवड केली जाते. चांगल्या चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निवड या फेस्टिवल साठी केली जाते. यासर्व बाबतीत उजवा ठरलेल्या ‘स्माईल प्लीज’ या सिनेमाच्या शिरपेचात या निवडीमुळे मानाचा तुरा रोवला गेला आहे.
काही दिवसांपूर्वीच किंग खान अर्थात शाहरुख खानच्या हस्ते या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले. त्याला भरपूर प्रतिसाद लाभला. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. याव्यतिरिक्त चित्रपटातील गाणी, मराठी सिनेसृष्टीतील तीसहून अधिक कलाकारांना एकत्र घेऊन चित्रित करण्यात आलेल्या अँथम सॉंगलाही रसिकांनी पसंती दिली. इतक्या नामांकित कलाकारांना एकत्र घेऊन गाणं चित्रित करण्यात आलेला मराठी सिनेसृष्टीतील बहुधा हा पहिलाच प्रयोग असावा. या चित्रपटाला मंदार चोळकर यांची गाणी लाभली असून रोहन-रोहन यांनी संगीत दिले आहे. तर नृत्यदिग्दर्शनाची धुरा बॉलिवूडचे नृत्यदिग्दर्शक बॉस्को-सिझर यांनी सांभाळली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट येत्या १९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर, सतीश आळेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.