मारूया बोंबा करूया दंगा १५ मार्चला होणार ‘शिमगा’
कोकणातील ‘शिमगा’ हा सण प्रत्येक कोकणी माणसासोबतच मुंबई, पुण्यातील किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा आणि चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. होळी या सणाला कोकणात ‘शिमगा’ म्हणतात. वर्षभर महाराष्ट्रातील सर्व चाकरमानी, मानकरी लोक या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. कोकणात होळी हा सण साजरी करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. शिवाय वेगवेगळ्या परंपरा देखील आहेत. यात एक महत्त्वाची परंपरा आहे आणि ती म्हणजे ‘उत्सवाची पालखी’. होळी सणात गावाच्या ग्रामदेवतेची पारंपरिक वाद्य वाजवून पालखी काढली जाते आणि ती नाचवली जाते. या पालखीत देव देवळातून पालखीत विराजमान होतात आणि भक्तांना दर्शन द्यायला निघतात. कोकणात अतिशय प्रसिद्ध असलेला हा पालखीचा अभूतपूर्ण सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी देशविदेशातून लोक कोकणात येतात. शिवाय सैन्यात असलेले आपले जवान देखील पालखी नाचवायला आवर्जून कोकणात येतात.
अशा या आगळ्या वेगळ्या विषयांवर लवकरच एक चित्रपट येतोय ‘शिमगा’. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलिज करण्यात आला आहे. राजेश शृंगारपुरे आणि भूषण प्रधान हे जोशात आणि आनंदात ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर पालखी नाचवताना टिझर मध्ये दिसत आहे. एका मंदिरासमोर हे दोघे पालखी नाचवत आहेत. त्यातच राजेश शृंगारपुरेचा भारदस्त आवाज कानी येतो,” माणसाच्या लढाईत देवाला मध्ये आणू नको, श्रद्धेला बाजारात बसवू नको”. असे सांगून जातो. आता हा चित्रपट नक्की कशावर आधारित आहे. हे अजून समजले नसले तरी काहीतरी वेगळे आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार हे नक्की. चित्रपटाचा विषय ट्रेलर आल्यावरच कळेल. पण त्यासाठी ट्रेलरची वाट पाहावी लागेल.
श्री केळमाई भवानी प्रॉडक्शन निर्मित ‘शिमगा’ हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. मूळचे कोकणाचे असणारे निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात राजेश शृंगारपुरे, भूषण प्रधान आणि कमलेश सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर पंकज पडघन यांची सुमधुर गीते आहेत. आणि लक्षवेधी असे पार्श्वसंगीत देखील असून गुरु ठाकूर आणि वलय यांची गीते यात असणार आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रीकरणाची धुरा अनिकेत खंडागळे यांनी सांभाळली आहे. होळीच्या म्हणजेच शिमग्याचा मुहूर्त गाठत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.