मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये ‘मेड इन हेवन’ सर्वाधिक लोकप्रिय !!
स्कोर ट्रेंड्स इंडियाने नुकतीच मार्चमध्ये लोकप्रिय असलेल्या 20 वेबसीरिजची लिस्ट काढली आहे. त्यानूसार, ‘मिर्झापूर’ नंबर वन स्थानी तर ‘सॅक्रेड गेम्स’ दूस-या स्थानावर आहे. मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबमालिकांमधली ‘मेड इन हेवन’ तिस-या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात वेब दुनियेत ‘मेड इन हेवन’, ‘दि फायनल क़ॉल’, ‘फ्लिप’, ‘दिल्ली क्राइम’आणि ‘दि शोले गर्ल’ ह्या वेबसीरिज रिलीज झाल्या. त्यापैकी ‘मेड इन हेवन’ लोकप्रियतेत सर्वौच्च स्थानी दिसून येतेय.
गेल्या काही दिवसांपासून स्कोर ट्रेंड्स इंडिया चार्ट्सवर ‘सॅक्रेड गेम्स’ आणि ‘मिर्झापुर’ ह्या दोन क्राइम थ्रिलर्सची प्रचंड लोकप्रियता दिसून आलीय. ह्या दोन्ही वेबसीरिज लोकप्रियतेत नेहमी पहिल्या किंवा दुस-या स्थानावरच असतात. त्यांना त्या स्थानावरून हटवणे हे बाकी वेबसीरिजसाठी एक आव्हानच म्हणावे लागेल.
यंदा मार्चमध्ये अमेज़ॉन प्राइमची नवी वेबमालिका ‘मेड इन हेवन’ रिलीज झाल्यावर डिजिटल न्यूज, न्यूज प्रिंट आणि वायरल न्यूजमध्ये ह्या मालिकेला चांगली लोकप्रियता मिळाली. त्यामूळेच तर 67.57 गुणांसह ही मालिका तिस-या स्थानावर आली. आणि मार्च 2019मध्ये झळकलेल्या वेबसीरिजमध्ये ती सर्वोच्च पदावर पोहोचली.
ह्यासोबतच, अर्जुन रामपाल, जावेद जाफरी आणि नीरज काबी स्टारर ‘झी-5 ओरिजिनल’च्या ‘द फाइनल कॉल’ने 42.57 गुणांसह लोकप्रियतेत सहावे स्थान पटकावले आहे. तर मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये ती दुस-या स्थानावर पोहोचली आहे.
इरॉस नाउ ओरिजिनलची बिजॉय नांबियार दिग्दर्शित, ‘फ्लिप’ 25.54 गुणांसह वेबसीरिजच्या लोकप्रियतेच्या चार्टमध्ये 11 व्या स्थानी पोहोचलीय. तर मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये तिस-या स्थानी आलीय.
ह्याशिवाय नेटफिक्स ओरिजिनल्सची ‘दिल्ली क्राइम’ 20.27 गुण मिळवून लोकप्रियतेच्या लिस्टमध्ये 12 व्या पदावर आहे. आणि मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबमालिकांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
भारताची पहिली स्टंटवूमन रेश्मा पठाणवर आधारित बायोपिक सीरिज, Zee 5 ओरिजिनलची ‘दि शोले गर्ल’ 10.41 गुणांसह14 व्या स्थानी पोहोचलीय. मार्च 2019मध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये पाचव्या स्थानावर आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये ‘मेड इन हेवन’ लोकप्रियतेच्या शिखरावर कमी अवधीत चढत गेली. ‘द फाइनल कॉल’, फ्लिप आणि ‘द शोले गर्ल’ ह्या मार्चमध्ये रिलीज झालेल्या वेबसीरिजही सध्या जनमानसात लोकप्रिय झालेल्या दिसून येतायत. वेब सीरीज़च्या अभिनेत्यांची वाढती लोकप्रियता जेव्हा आम्ही बारकाईने पाहू लागलो. तेव्हा आम्हांला असं लक्षात आलं की, आज बॉलीवूड स्टार्सप्रमाणेच ह्या वेबमालिकांमध्ये काम करणा-या अभिनेत्यांची लोकप्रियता आहे. सोशल प्लेटफॉर्म, वायरल न्यूज़, डिजिटल न्यूज़ आणि न्यूज़पेपर्स मध्ये त्यांचा वाढता प्रेजेंस ते स्टार्स झाल्याचाच पूरावा आहे. मार्चमध्ये रिलीज झालेली ‘दिल्ली क्राइम’सुध्दा कमी अवधीत लोकप्रिय झाली.ज्यामूळे आम्हांला असं वाटतंय, की ही वेबसीरिज येत्या काही दिवसांमध्ये लोकप्रियतेची शिखरे पादाक्रांत करेल. “
अश्वनी कौल पूढे सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”