Marathi News
‘डोक्याला शॉट’ मध्ये सुव्रत, प्राजक्ताचे तामिळ गाणं
नुकताच ‘डोक्याला शॉट’ या सिनेमाचा ट्रेलर आणि टायटल सॉंग प्रदर्शित झाले असून मराठी आणि तामिळ अशा दोन भिन्न संस्कृतीचे मिश्रण असलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या सिनेमात महत्त्वाची बाब म्हणजे अभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी या दोघांनी या सिनेमात एक रोमँटिक तामिळ गाणं गायले आहे. ही आश्चर्याची गोष्ट असली तरी हे खरं आहे आणि हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यावेळी आम्हाला दिग्दर्शक शिवकुमार पार्थसारथी यांनी सांगितले ,की या सिनेमात आम्हाला एक गाणं गायचे आहे. तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो. पण ज्यावेळी आम्हाला समजले, की हे गाणं मराठीत नसून तमिळ भाषेत गायचे आहे त्यावेळी आम्ही जरा गोंधळलोच.
याआधी आम्ही कधीच गाणं गायलं नव्हतं. प्राजक्ताला गाण्याची थोडी फार ओळख होती, परंतु मी या सगळ्यात अगदी नवखा होतो. या सर्व गोष्टी शिव सरांना समजल्यावर त्यांनी गाणं रेकॉर्ड करायच्या काही दिवस आधी ‘ते’ गाण, त्याचा अर्थ मराठीत पाठवले. त्यानंतर आम्ही ते गाणं ऐकून, वाचून सराव करायला सुरुवात केली. सोबतच सूर नीट यावे, यासाठी वारंवार रियाज केला.
सरतेशेवटी गाण्याच्या रेकॉर्डिंगला आम्ही गेलो आणि एका दिवसात हे गाणं रेकॉर्ड केलं. तामिळ भाषेतील या गाण्याला नवोदित संगीतकार श्रीकांत-अनिता यांनी संगीत दिले आहे. हे गाणं मराठीत सुद्धा प्रदर्शित होणार आहे. मराठी कलाकारांनी तामिळ भाषेत गाणं गाणे, ही बहुदा पहिलीच वेळ असावी. हे गाणं लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. उतुंग हितेंद्र ठाकूर आणि ‘व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून शिवकुमार पार्थसारथी यांनी ‘डोक्याला शॉट’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच या सिनेमात सुव्रत जोशी, रोहित हळदीकर ओंकार गोवर्धन, गणेश पंडित आणि प्राजक्ता माळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.