“प्रेमवारी” या चित्रपटाचे ‘पूजाच्या हळदीला’ हे तर्राट सॉंग रिलीज झाले. लग्नाच्या आधी हळदीच्या कार्यक्रमातील हे गाणं एक पार्टी सॉंग आहे. भारत गणेशपुरे आणि अभिजित चव्हाण या गाण्यात नाचताना दिसत आहेत. या गाण्याचे चित्रीकरण शिर्डी जवळच्या वारी गावात, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते राजेंद्र गायकवाड यांच्या घरी करण्यात आले आहे. हे गाणं चित्रित करण्यासाठी संपूर्ण घरामध्ये लग्नघर दिसावे म्हणून अनेक बदल करण्यात आले होते. दोन रात्री मध्ये हे गाणं चित्रित झाले. असे हे जल्लोषमय आणि उडत्या चालीचं गाणं अमितराज आणि आदर्श शिंदे यांनी गायले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज यांनी या गाण्याला संगीत दिले असून, मंदार चोळकर यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. या भन्नाट गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी केले आहे.
प्रेम हा शब्द सर्वांच्या जिव्हाळ्याचा शब्द आहे. प्रेम या शब्दाची व्याख्या कोणीही एका शब्दात, एका वाक्यात व्यक्त करू शकत नाही. अशाच या प्रेमाला नवीन अर्थ देणारा ‘प्रेमवारी’ चित्रपट ८ फेब्रुवारी ला प्रदर्शित होत आहे.
या सिनेमात चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रोमँटिक सिनेमा आणि व्हॅलेंटाइन डे चा महिना हा एक योगायोगच म्हणावा लागेल. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे. या सिनेमाला . या सुंदर चित्रपटाचे लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे.