चतुरस्त्र गायक शंकर महादेवन यांनी गायलेले ‘मोगरा फुलला’ चित्रपटामधील शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला, रोहित राऊतने संगीतबद्ध केलेले स्वप्नील जोशीच्या चित्रपटातील गाणे लोकप्रियतेच्या वाटेवर
जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ चित्रपटामधील शीर्षकगीत आघाडीचे चतुरस्त्र गायक शंकर महादेवन यांनी गायले आहे. हे गाणे निर्मात्यांनी नुकतेच प्रदर्शित केले असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. हे गाणे तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊतने संगीतबद्ध केले असून अभिषेक कणकर यांनी ते लिहिले आहे. ‘मोगरा फुलला’ चित्रपट १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
“हलके अन हळुवारसा..हो मुका अन अलवारसा…अधिऱ्या अधिऱ्या ह्या अंगणी, अपुऱ्या अपुऱ्या माझ्या मनी….मोगरा फुलला, मोगरा फुलला…” या बोलाचे हे शीर्षकगीत शंकर महादेवन यांनी अगदी तरलेने गायले आहे. हे गीत आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी ऐकले आहे, त्यांनी त्याला पसंती दिली आहे. ते लवकरच मराठी रसिकांमध्ये लोकप्रिय होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
स्वप्नील जोशी, त्याची आई नीना कुलकर्णी, सई देवधर आणि इतर कलाकारांवर चित्रीत झालेले हे गाणे जणू चित्रपटाच्या कथेचे सार सांगून जाते. मनाच्या विविध स्थिती अधोरेखित करताना, चित्रपटाचा नायक आणि यातील इतर पात्रांची नेमकी स्थिती या गाण्यातून समोर येते. विविध मानवी भावभावनांचा हिंदोळा या कथेतून हळुवार हाताळला गेला आहे, याची एक पुसटशी कल्पना या गीतातून येते.
पद्मश्री विजेते शंकर महादेवन हे नाव मराठी संगीत आणि चित्रपटसृष्टीला नवीन नाही. ‘कट्यार काळजात घुसली’मधील अभिनयातून तर ते मराठी घराघरात पोहोचले आहेत. त्याचबरोबर त्यांनी मराठीमध्ये अनेक गाणीही गायली आहेत. ‘कट्यार काळजात घुसली’मधील गाण्यांबरोबरच त्यांचे माझ्या मना… (लग्न पाहावे करून), मन उधाण वाऱ्याचे… (अगं बाई अरेच्चा) ही गाणी मराठी रसिकांच्या ओठावर रेंगाळत असतात.
“मराठी चित्रपटसृष्टी प्रत्येकबाबतीत प्रगल्भ आहे. मराठीमध्ये गायला मला नेहमीच आवडते. ‘मोगरा फुलला’मधील अनुभवही अगदी वेगळा होता कारण गाण्याचे बोल आणि त्यांना दिलेली चाल अगदी मधुर अशीच आहे,” महादेवन म्हणतात.
‘मोगरा फुलला’ येत्या १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून काही दिवसांपूर्वी या सिनेमातील कलाकारांचे हटके लुकमधील पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले होते. या कलाकारांच्या लुकला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे या चित्रपटामध्ये नेमकं काय काय पहायला मिळणार याबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रोहित राऊतने संगीतबद्ध केलेले व गायलेले ‘मोगरा फुलला’मधील श्रवणीय असे ‘मनमोहिनी‘हे गाणे प्रेक्षकांच्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते. हे गाणे स्वप्नील जोशी आणि सई देवधर यांच्यावर चित्रित झाले आहे. त्यालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
‘मोगरा फुलला‘ मधील गाण्याच्या अनुभवाबद्दल रोहित राऊत सांगतो की, “मोगरा फुलला’सारख्या सुंदर कथेच्या सिनेमासाठी काम करायला मिळणं हे माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होतं. दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांचेदेखील मला खूप सहकार्य लाभले, कारण मला असं वाटत की, एखाद गाणं संगीतकाराला सुचण्याआधी ते गाणं कोणत्या परिस्थितीला हवंय हे त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला सुचतं. चित्रपटातील शीर्षकगीत पूर्णपणे मधुर,श्रवणीय आहे आणि ते प्रेक्षकांना प्रसन्न अनुभव देऊन जाईल.”
या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि सई देवधर यांच्याबरोबर चंद्रकांत कुलकर्णी, संदिप पाठक, नीना कुळकर्णी, सुहिता थत्ते, समिधा गुरु,विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आनंद इंगळे, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.
‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जीसिम्स फिल्म्स’ने आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपन्यांमधील एक अग्रणी कंपनी असलेल्या ‘पॅनोरमा स्टुडिओज’ने ‘मोगरा फुलला’च्या वितरणाची जबाबदारी घेतली आहे.
प्रख्यात दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनी ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. त्यांनी याआधी अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यांमध्ये लपंडाव, सरकारनामा, लेकरू या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना फिल्मफेअर आणि स्क्रीन यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. ‘मोगरा फुलला’ला स्वतःचा असा वेगळा ‘टच’ देण्यास त्या सज्ज झाल्या आहेत.