डोक्याला शॉट: मिका सिंग यांचे मराठीत दमदार पदार्पण
‘डोक्याला शॉट’ नावाचा धमाल कॉमेडी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नावावरून ह्या सिनेमात काहीतरी वेगळे आणि मजेशीर पाहायला मिळणार हे नक्की आहे. या सिनेमामध्ये प्रेक्षकांना एक सरप्राइज मिळणार आहे. आणि ते म्हणजे बॉलीवूड मध्ये आपल्या भारदस्त आवाजामुळे ओळखला जाणारा आणि असंख्य लोकप्रिय हिंदी गाण्यासाठी आपला आवाज देणारा ‘ दि मिका सिंग’ या चित्रपटाच्या शीर्षक गीताला आपला आवाज देणार आहेत.
तर मराठीमधील अनेक हिट गाण्यांना संगीत देणाऱ्या आणि मराठी चित्रपट सृष्टीत लोकप्रिय असणाऱ्या ‘अमितराज’ यांनी या शीर्षक गीताला संगीतबद्ध केले आहे. उत्तुंग ठाकूर यांना या उडत्या चालीच्या आणि मस्ती मूड अशा गाण्याला जरा वेगळा आणि मराठी मध्ये आजवर कधीही न ऐकलेला असा आवाज पाहिजे होता. म्हणून त्यांनी मिका सिंग यांचे नाव अमितराज यांना सुचवले आणि क्षणाचाही वेळ न लावता अमितराज यांनी देखील या नावाला संमती दर्शवली. याच निमित्याने मिका सिंग हे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण देखील करणार आहेत.
डोक्याला शॉटच्या निमित्याने ‘अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देण्यासाठी सज्ज आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘डोक्याला शॉट’ हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर अनेक नावाजलेल्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावणारे शिवकुमार पार्थसारथी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.