Marathi Trends

‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचे ‘माझ्या दिलाचो’ गाणे झाले रिलीज !

माझ्या दिलाचोसंजय जाधव दिग्दर्शित लकी सिनेमाचे ‘माझ्या दिलाचो’ हे कोंकणी गाणे रिलीज झाले आहे. ‘दूनियादारी’ सिनेमातून ‘लिटील चॅम्प’ रोहित राऊतला सिनेसृष्टीत लाँच केल्यावर आता‘राइझिंग स्टार’ चैतन्य देवढेलाही संजय जाधव ह्यांनी लकी सिनेमातून चित्रपटसृष्टीत लाँच केले आहे.  सूर नवा ध्यास नवा रिएलिटी शोमधून दिसत असलेल्या चैतन्यचे हे पहिले मराठी गाणे आहे.

गीतकार ‘यो’ (सचिन पाठक)च्या शब्दांना संगीतकार पंकज पडघन ह्यांनी संगीत दिले आहे. आणि आळंदीच्या चैतन्य देवढेने ह्याला स्वरसाज चढवला आहे. लकी चित्रपटात हे गाणे अभय महाजनवर चित्रीत झाले आहे.

चैतन्यच्या निवडीविषयी लकी सिनेमाचे निर्माते सूरज सिंग सांगतात, “ह्या गाण्याच्या सिच्युएशनसाठी आम्हाला एका लहान मुलाचा आवाज हवा होता. आणि दिग्दर्शक संजय जाधव ह्यांना चैतन्यचा आवाज खूप आवडला. आळंदीच्या चैतन्यला आवाजाचे दैवी देणगीच मिळालीय. त्याच्या आवाजातली निरागसता ह्या गाण्याला अगदी साजेशी आहे. आणि अभयने ही हे गाणे रूपेरी पडद्यावर उत्तम साकारलंय.”

संगीतकार पंकज पडघन म्हणतात, “नव्या प्रतिभेसोबत काम करायला मला आणि संजयदादांना नेहमीच आवडते. चैतन्यची आकलन क्षमता खूप चांगली आहे. त्याने एकाच दिवसात ह्या गाण्याचा रियाज करून गाण्याचे रेकॉर्डिंग केले. आणि हे कोंकणी गाणे ऐकताना तो कोंकणी पहिल्यांदाच बोलतोय, असं तुम्हांला अजिबात वाटणार नाही, ही ह्यातली जमेची बाजू म्हणायला हवी.”

चैतन्य देवढे म्हणतो, “मी स्वत:ला खूप लकी समजतो, की सिनेसृष्टीतल्या अशा दिग्गजांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत पंकज पडघन ह्यांनी संगीतबध्द केलेली गाणी ऐकली होती. आणि संजयदादांचे सिनेमे पाहिले होते. पण ह्या दोन दिग्गजांना प्रत्यक्ष भेटायची आणि त्यांच्या सिनेमातून चित्रपटसृष्टीत लाँच होण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यावर माऊलींचीच कृपा आहे, असे मी मानतो.”

अभय महाजन म्हणतो, “ह्या गाण्यातून चैतन्य देवढेला जसं संजयदादांनी लाँच केले, तसेच गोव्यातल्या प्रतिभेलाही ह्या गाण्यातून रूपेरी पडद्यावर आणलंय. माझ्यासोबत गाण्यात नाचणारे सगळे डान्सर्स गोव्यातले आहेत. आणि त्यांची ही पहिली फिल्म आहे. ऑक्टोबरच्या 40-45 डिग्रीच्या तळपत्या उन्हांत हे गाणे चित्रीत झालंय. पण चैतन्यच्या आवाजातल्या गोडव्यामूळे आणि तिथल्या डान्सर्सच्या चैतन्यामूळे असावं कदाचित डान्स करताना हुरूप येत होता.”

 ‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button