Hum bane Tum Bane : वडील-मुलीच्या नाते अजून घट्ट विणण्यासाठी सोनी मराठीने घेतला खास पुढाकार
वडील आणि मुलगी यांच्यामधील नातं हे खूप अनोखं असतं. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे सुपरहिरो असतात आणि एक आदर्श व्यक्ती म्हणून मुलगी वडीलांकडे पाहत असते. ‘मुलगी झाली प्रगती झाली’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकलंय, मुलगी झाली की प्रगती तर होतेच त्याचसोबत मुलीच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घटनांत वडील हक्काने सामिल होतात. मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे ‘मासिक पाळी’. मासिक पाळी हा विषय उघडपणे किंवा बिनधास्तपणे बोलला जातोच असं नाही, पण सोनी मराठी वाहिनीने हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि त्यावर न लाजता व्यक्त व्हायला हवं असा सुंदर तसेच महत्त्वपूर्ण संदेश ‘ह.म. बने तु.म.बने’ या मालिकेतून दिला आहे.
‘ह.म. बने तु.म.बने’ मध्ये रेहाला पहिली मासिक पाळी सुरु झाली आहे पण आई-काकू-आजी घरात नसल्यामुळे या नाजूक परिस्थितीत रेहाला तिच्या वडीलांचा आधार मिळाला आहे. या मालिकेतून वडील आणि मुलगी यांच्या नात्यांतील फुलणारे प्रेम अधोरेखित तर होणार आहे. आईनंतर वडील पण मुलीला तितक्याच आपुलकीने-प्रेमाने समजून घेऊ शकतात हा विचार पण सोनी मराठीने मांडला आहे. मासिक पाळी सारख्या महत्त्वाच्या विषयावर हलक्या-फुलक्या पध्दतीने भाष्य करुन, याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी सोनी मराठीने घेतलेल्या या पुढाकाराचे महाराष्ट्रातील जनता नक्कीच कौतुक करणार. तसेच मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी देखील सोनी मराठीच्या या पुढाकाराचे कौतुक करत आपल्या मुलींसोबत आपले मैत्रीचे आणि विश्वासाचे नाते असावे असे म्हटंले.