माधुरी दीक्षित आणि अजय देवगण यांनी शेअर केला ‘हिरकणी’चा ट्रेलर
हिरकणी’ म्हटलं की सर्वप्रथम आठवते ते म्हणजे शाळेतील इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील गोष्ट आणि ती गोष्ट आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार यामुळे सर्वत्र केवळ ‘हिरकणी’चीच चर्चा चालू आहे. कोजागिरीच्या रात्री हिरकणीने तिच्या बाळाच्या भेटीसाठी रायगडाची खोल कडा उतरुन जाण्याचं धाडस केलं होतं. प्रेक्षकांना हिरकणीची झलक दाखवण्यासाठी कोजागिरीच्या निमित्ताने या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
ही गोष्ट आहे रायगडाच्या पायथ्याशी राहणारी साधी गवळण हिरा उर्फ ‘हिरकणी’ या धाडसी आईची. सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे कोजागिरीच्या रात्री आई हिरकणी गडावर आणि लेकरु घरी एकटे असते. आपले बाळ घरी एकटे असेल, भुकेले असेल या विचाराने व्याकूळ झालेली हिरकणी कोजागिरीच्या रात्री असा गड उतरुन खाली जाण्याची जोखीम उचलते ज्याचे वर्णन करण्यात आले आहे की, “जिथून फक्त पाणी खाली जाऊ शकते आणि वारा वर येऊ शकतो.”
गड उतरताना हिरकणीला कोणत्या-कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याची झलक ट्रेलर मध्ये दाखवण्यात आली आहे. तसेच ‘हिरकणी’ची भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अतिशय सुंदररित्या साकारली आहे. हिरकणीच्या चेह-यावरील आनंद, नाराजी, हास्य, काळजी, प्रेम सोनालीने खूप छान पध्दतीने दाखविल्या आहेत. अभिनेता अमित खेडेकरने ‘जीवा’ व्यक्तिरेखेची भूमिका साकारली आहे. ऐतिहासिक कथा, कलाकारांची नवीन जोडी, चित्रपटातील गाणी आदी गोष्टींमुळे ‘हिरकणी’ चित्रपटाविषयी उत्सुकता वाढणार यात मुळीच शंका नाही.
विशेष म्हणजे या चित्रपटाचा ट्रेलर माधुरी दीक्षित आणि अजय देवगण यांना देखील आवडला आणि त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया वर शेअर देखील केला.
प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ चित्रपटाचे लिखाण चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे. मागीज पिक्चर्स यांच्या सहकार्याने इरादा एंटरटेनमेंटने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. फाल्गुनी पटेल या निर्मात्या आणि लॉरेन्स डिसुझा हे सहनिर्माते आहेत. राजेश मापुस्कर हे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. २४ ऑक्टोबरला दिवाळीची मनोरंजक भेट म्हणून ‘हिरकणी’ येतेय तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.