Fugay Teaser Poster Launch – स्वप्निलच्या वाढदिवशी कापला ‘फुगे’ सिनेमाचा केक

Fugay Teaser Poster Launch
Fugay Teaser Poster Launch

Fugay Teaser Poster Launch नवीन प्रयोग आणि नवीन संकल्पनांनी बहरलेले अनेक सिनेमे आता मराठीत येताना दिसत आहे. अशा या नावीन्यतेने नटलेल्या सिनेमांची रंगत आणखीन वाढवण्यासाठी चित्रपटांची नावेदेखील हटके ठेवण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. सिनेमांच्या हटके नावांच्या यादीत आगामी ‘फुगे’ या सिनेमाचा देखील समावेश होत आहे. मितवा फेम दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘फुगे’ या सिनेमाची सध्या मोठी चर्चा होत आहे. धम्माल मस्तीने भरलेल्या या सिनेमाचे सांताक्रुज येथील लाईटबॉक्समध्ये मोठ्या उत्साहात मोशन पोष्टर आणि टायटल सॉंगचा टीजर लॉंच करण्यात आला. सिनेमातील सर्व स्टारकास्टच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात मराठीचा सुपरहिरो आणि या सिनेमातील प्रमुख कलाकार स्वप्नील जोशींचा वाढदिवसदेखील मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

तत्पूर्वी, फुगे या सिनेमाच्या नावाला साजेसे असे ‘हे फुगे’ हे मजेशीर शीर्षकगीत उपस्थितांसमोर सादर करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात रंगत आणली ती, स्वप्नील – सुबोधच्या खुमासदार निवेदनाने.  या दोघांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळत ‘फुगे’ स्टाईलमध्ये उपस्थितांना आपल्या गप्पांमध्ये खिळवून ठेवले होते. त्यांच्यातील ही ऑफस्क्रीन केमिस्ट्री पडद्यावर देखील धम्माल करणार हे याचवेळी सिद्ध झाले. विशेष म्हणजे आपली ओळख करून देताना या दोघांनी स्वप्नील भावे  आणि सुबोध जोशी अशी आडनावांची अदलाबदल करून उपस्थितांची उत्कंठा वाढवली. त्यानंतर फुगे सिनेमाचे मोशन पोष्टर आणि सिनेमातील शीर्षकगीताचा टीजर सादर करण्यात आला.  हा सिनेमा एका वेगळ्या धाटणीचा असून आम्हांला या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र काम  करण्याची
संधी मिळाली असल्याचे हे दोघे सांगतात. मंदार चोळकर लिखित या गाण्याला बॉलीवूडचे आघाडीचे संगीत दिग्दर्शक रोचक कोहली यांनी ताल दिला आहे. शिवाय सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि सिद्धार्थ महादेवन यांनी सुबोध आणि स्वप्नीलचे बोल गायले आहे. तसेच कॉरियोग्राफर उमेश जाधव यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. मोठ्या पडद्यावरील ‘हे फुगे’ या गाण्यात स्वप्नील-सुबोधची केमिस्ट्री अगदी रंगात आलेली दिसून येतेय. 

स्वप्नीलच्या मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटातील मध्यमवर्गीय आणि पुण्याच्या स्वाभिमानी नायकाची भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली होती त्यामुळे पुन्हा आता तशाच काहीश्या भूमिकेत स्वप्नील प्रेक्षकांच्या भेटीला  येत आहे. तसेच आपल्या धिरगंभीर आणि ऐतिहासिक भूमिकांतून रसिकांच्या मनात राज्य करणाऱा सुबोध भावे मात्र यावेळी एका हटके भूमिकेत दिसणार आहे. आजचा मॉडर्न आणि डेनिम घालणाऱ्या मनमौजी तरूणाच्या भूमिकेत तो दिसणार आहे. फुगे सिनेमाच्या पोस्टरलाही कार्यक्रमात मोठी पसंती मिळाली. स्वप्नील- सुबोधचा याराना प्रथमच या मोशन पोष्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला. हा मोशन पोष्टर पाहताना प्रथमदर्शनी स्वप्नील-सुबोध यांच्यातली मैत्री दिसून येते, मात्र त्यादरम्यान दोघांच्या हातावर गोंदलेली एकमेकांची नावे पाहिल्यानंतर ही नेमकी काय भानगड आहे, असा प्रश्न देखील उपस्थित होतो. शिवाय पोष्टरवरील या दोघांमधून उडत जाणाऱ्या रंगीबेरंगी फुग्यांमुळे हा सिनेमा नक्कीच एका वेगळ्या धाटणीचा असल्याचे समजून येते.

इंदर राज कपूर या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहे. एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनाची खुमासदार मेजवानी  देण्यास सज्ज झाला आहे. शिवाय स्वप्नील आणि सुबोधला प्रथमच एकत्र पाहण्याचा योगही या सिनेमाद्वारे जुळून आला असल्यामुळे येत्या २ डिसेंबर रोजी हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेरसिकांसाठी दुहेरी मेजवानी घेऊन येणार आहे.  

Exit mobile version