संजय जाधव ह्यांचा ‘दुनियादारी’ सिनेमा 19 जुलै 2013 ला रिलीज झाला होता. सिनेमा रिलीज होताच शिरीन, श्रेयस (बच्चू) ,दिगंबर (दिग्या), मिनाक्षी (मीनू), साईनाथ (साई) ह्या दुनियादारीतल्या मित्रांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं. दुनियादारी सिनेमाने मराठी चित्रपटांची परिभाषा बदलली. बॉक्स ऑफिसवर विक्रमी कलेक्शन करणा-या ह्या आयकॉनिक मराठी सिनेमाने नुकतीच पाच वर्ष पूर्ण केली आहेत.
ह्या निमित्ताने दुनियादारी सिनेमाच्या टीमने एकत्र येऊन सेलिब्रेशन केले. सिनेमाचे प्रस्तुतकर्ता नानुभाई जयसिंघानी, दिग्दर्शक संजय जाधव, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सुशांत शेलार, म्युझिक दिग्दर्शक पंकज पडघन, अमितराज, रोहित राऊत, दिपक राणे ह्यांनी केक कापून सेलिब्रेशन केले.
ह्यावेळी सई ताम्हणकर खूपच भावूक झाली होती. सई ह्या सेलिब्रिशननंतर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाली, “मला आठवतंय, ह्याचवेळी पाच वर्षांपूर्वी सगळीकडे हाऊसफुलचे बोर्ड लागले होते. ही फिल्म माझ्यासाठी अत्यंत स्पेशल फिल्म आहे. दुनियादारीमूळे आम्हा सर्वच कलाकारांची आयुष्यं कायमची बदलली. दुनियादारी सिनेमाने मला फक्त पैसा आणि प्रसिध्दीच नाही दिली, तर आयुष्यभरासाठी साथ देतील, अशी जीवाभावाची माणसं दिली. त्यामूळेच 19 जुलै हा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. प्रत्येक कलाकाराला असा दिवस देवाने नक्की दाखवावा.”
दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “हा चित्रपट बनवताना तो प्रेक्षकांना आवडेल असा आम्हांला विश्वास होता. पण दुनियादारी सिनेमा मराठी सिनेसृष्टीतले त्याअगोदरचे सर्व रेकॉर्ड तोडेल, असं वाटलं नव्हते. प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या ह्या प्रेमाची उतराई करणे अशक्यच आहे. असंच प्रेम यंदा रिलीज होणा-या आमच्या लकी सिनेमालाही मिळावं, अशी अपेक्षा आहे.”