Dry Day : ‘ड्राय डे’ नावाप्रमाणे सिनेमातील गाणीदेखील ठरताहेत सुपरहिट 

Dry Day

‘गोरी गोरी पान, फुलासारखी छान…’ ही कविता आता नव्या अंदाजात गायली जात आहे. लहानपणी प्रत्येकांनी म्हंटलेल्या या कवितेचे आगामी ‘ड्राय डे’ सिनेमातील रिमिक्सने सध्या सुपरहिट कामगिरी केली आहे. आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव लिखित तसेच दिग्दर्शित ‘ड्राय डे’ सिनेमातील या सुपरहिट गाण्याबरोबरच, इतर गाणीदेखील देखील सिनेप्रेक्षकांमध्ये तुफान प्रसिद्धी मिळवत आहे. येत्या १३ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील हिट गाण्यांमुळे, ‘ड्राय डे’ ची प्रदर्शनापूर्वीच मोठी चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.

सिनेमा सुपरहिट करण्यासाठी त्यांतील गाण्यांची मोठी भूमिका असते, हे यापूर्वी प्रदर्शित झालेल्या अनेक सिनेमाद्वारे स्पष्ट झाले आहे. ‘ड्राय डे’ सिनेमाच्या गाण्यांचा दर्जा लक्षात घेता, या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी हेच सूत्र लागू होण्याची दाट शक्यता आहे. कारण संजय पाटील यांची निर्मिती असलेल्या या सिनेमातील ‘अशी कशी’ हे रोमँटिक गाणे असो वा, अवघ्या महाराष्ट्राला लग्नसराईत थिरकवणारे ‘गोरी गोरी पान’ हे गाणे असो हिंदीच्या सुप्रसिद्ध गायकांचा आवाज त्यांना लाभला आहे.
संगीतदिग्दर्शक अश्विन श्रीनिवासन यांनी ड्राय डे सिनेमातील सर्व गाण्यांना संगीत दिले असून, त्यापैकी सध्या गाजत असलेले जय अत्रे लिखित ‘अशी कशी’ हे प्रेमगीत आजच्या तरुणाईला आपलेसे करीत आहे. जोनीता गांधी आणि अॅश किंग या हिंदीच्या सुप्रसिद्ध गायकांचा गोड आवाज या गाण्याला लाभला असल्यामुळे, ते अधिक रोमँटिक झाले आहे. सिनेमातील प्रमुख कलाकार ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल या फ्रेश जोडीवर हे गाणे आधारित असल्यामुळे, आजच्या तरुण पिढीला प्रेमाच्या गुलाबी दुनियेची सफर यातून घडून येते. शिवाय समीर सामंत लिखित ‘गोरी गोरी पान’ या धम्माल गाण्याने तर प्रसिद्धीचा ऊच्चांक गाठला आहे. सोशल नेटवर्किंग तसेच रेडियो मिर्चीवर सलग सहा महिने नंबर १ पोझिशनवर हे गाणे वाजवले जात आहे. हळदीची मज्जा अनुभवणाऱ्या या गाण्याला रोंकीनी गुप्ता आणि तृप्ती खामकर या हिंदीच्या प्रसिद्ध गायिकांनी आवाज दिला आहे. एव्हढेच नव्हे तर, आजच्या तळीरामांवर आधारित गायक विशाल ददलानी यांच्या आवाजातील जय अत्रे लिखित ‘दारू डिंग डांग’ हे गाणेदेखील लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
तरुणाईचे भावविश्व मांडणारा हा सिनेमा प्रेक्षकांना येत्या जुलै महिन्यात आगळावेगळा ‘ड्राय डे’चा आनंद देऊ करणार आहे. या सिनेमात ऋत्विक- मोनालिसा बरोबरच कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, आयली घिए, सानिका मुतालिक, अरुण नलावडे आणि जयराम नायर हे कलाकारदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी घेऊन येणार हा ‘ड्राय डे’ इतरांहून अगदी वेगळा असल्यामुळे या हटके ‘ड्राय डे’ ची प्रेक्षकदेखील प्रतीक्षा करत असतील हे निश्चित !
Exit mobile version