बहीण भावाच्या अतूट नात्याचे दर्शन घडवणारे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटक लवकरच सुवर्णमहोत्सवी प्रयोग साजरा करणार आहे. शनिवार, २७ एप्रिल रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रात्री ९.३० वाजता तर २८ एप्रिल रोजी ह्या नाटकाचा पन्नासावा प्रयोग पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या निमित्ताने ह्या नाटकाचे टिझरही सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे.
अल्पावधीतच ह्या नाटकाने प्रेक्षकांना आपलंस करून अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. परदेशातही ह्या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. बहीण -भावाच्या नात्यातील विश्वास, प्रेम एका अनोख्या रूपात ह्या नाटकाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे प्रिया बापटने ह्या नाटकाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे. सोनल प्रॉडक्शन निर्मित, अद्वैत दादरकर दिग्दर्शित ह्या नाटकात उमेश कामत, ऋता दुर्गुळे, आरती मोरे, ऋषी मनोहर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ह्या नाटकाचे लिखाण कल्याणी पाठारे यांनी केले आहे.