२०२० मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार सायली संजीवची ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’
प्रत्येकाच्या आयुष्यात नात्याला खूप महत्त्व असतं आणि नात्यांच्या सहवासामुळे अनेक दु:खं सहन करण्याची ताकद मिळते तर सुखी क्षणांचा आनंद साजरा करायला सोबत मिळते. मग ती नाती आपली किंवा परकी असा भेदभाव नसला तरी मायेची, प्रेमाची भावना त्यामध्ये असते. नात्यांचे महत्त्व पटवून देणारा एक नवा कोरा मराठी चित्रपट ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’ नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
युगंधर क्रिएशन्स प्रस्तुत आणि अनिकेत राजकुमार बडोले निर्मित ‘दाह’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मल्हार गणेश यांनी केली आहे तर डॉ. सतिश (अतुल) सोनोने यांनी कथा लिहिली आहे. या चित्रपटात मराठी मालिका आणि चित्रपटातील सुप्रसिध्द अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेते गिरीश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासह राधिका विद्यासागर, सुहृद वार्डेकर, यतिन कार्येकर, उमा सरदेशमुख, किशोर चौघुले यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.
‘दाह’ चित्रपटाची कथा ही कौटुंबिक आहे. अतिशय धार्मिक आणि आदर्श वाटाव्यात अशा सौ. साने आणि सुप्रसिध्द डॉक्टर श्री. साने या सुखी जोडप्याची ही गोष्ट आहे. त्यांची मुलगी ‘दिशा’च्या येण्याने त्यांच्या संसारात सुख आणि आनंद नांदू लागते. पण हा आनंद किती काळ टिकेल? दिशा ही त्यांची पोटची मुलगी आहे की दत्तक? दत्तक घेतली असेल तर तिचा स्वीकार आनंदाने केला जाईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे नवीन वर्षात मिळतील.
चित्रपटाच्या कथेसह यामधील गाणी देखील थेट प्रेक्षकांच्या काळजाला भिडतील अशी तयार करण्यात आली आहेत. संगीतकार प्रफुल्ल स्वप्निल यांनी गाण्यांना संगीत दिले आहे तर प्रत्येक शब्दांतून सुंदर अर्थ मांडणारे गीतकार मंदार चोळकर आणि तेजस रानडे यांनी गाण्यांचे बोल लिहिले आहेत. संगीतकार आणि गीतकार यांनी तयार केलेल्या गाण्यांना स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, अनिरुध्द वानकर, बेला शेंडे आणि मधुश्री यांनी आवाज दिला आहे.
मनाला भिडणा-या ‘दाह’ चित्रपटाची पटकथा उन्मन बाणकर आणि कौस्तुभ सावरकर यांनी लिहिली आहे तर संवाद कौस्तुभ सावरकर यांचे आहेत. उमेश शिंदे हे कार्यकारी निर्माते आहे.
अभिनेत्री सायली संजीवचा नवा चित्रपट आणि नवीन भूमिका असलेला ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे.