Marathi News
‘बकेट लिस्ट’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद!
२५ मे ला जगभर प्रदर्शित झालेल्या ‘बकेट लिस्ट’ ह्या चित्रपटाला जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या मराठी चित्रपटाद्वारे आजवर आपले सौंदर्य, नृत्य, अदा, गुणवत्ता यांच्या जोरावर लाखो-करोडो प्रेक्षकांची मने जिंकणारी ‘माधुरी दिक्षित’ प्रथमच मराठी चित्रपटातून आपल्या चाहत्यांवर वेगळीच मोहिनी घालते. प्रेक्षकांबरोबरच बॉक्स ऑफिसवर या मोहोनीची जादू झाल्याचं आपल्याला दिसून येते आहे. २५मे ला प्रदर्शित झालेल्या ‘बकेट लिस्ट’ चित्रपटाने अवघ्या ३ दिवसांतच जवळ-जवळ ३.६६ करोडचा गल्ला जमवून चित्रपटाला जोरदार ओपनिंग दिली आहे. शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनुक्रमे ९६ लाख, शनिवारी १.३० करोड तर रविवारी १.४० करोडचा पल्ला गाठण्यात या चित्रपटाला यश मिळाले आहे.
बॉलिवूडमध्ये स्वतःची विशिष्ट अशी ओळख निर्माण करणारी माधुरी दिक्षित ‘बकेट लिस्ट’सारख्या मराठी चित्रपटातून मराठी असणं, मराठी बाणा जपणं, मराठमोळ्या स्त्रीचं सामर्थ्य आणि मराठी माणसांचं नाती जपण्याचं गूढ रहस्य उलगडत असून मराठी रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपल्या प्रेमात पाडत आहे.
धर्मा, करण जोहर आणि ए ए फिल्म्स प्रस्तुत, दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर लिखीत-दिग्दर्शित बकेट लिस्ट चित्रपटाचं सहलेखन देवश्री शिवडेकर यांनी केलं आहे. डार्क हॉर्स सिनेमाज्, दार मोशन पिक्चर्स आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित चित्रपट ‘बकेट लिस्ट’ 25 मे ला जगभरात प्रदर्शित झाला असून या चित्रपटाद्वारे माधुरी चे नवे रंग तुम्हीही अनुभवा आपल्या जवळच्या चित्रटगृहात…