उमेश आणि प्रियाला ‘आणि काय हवं’

लग्नानंतर केलेल्या प्रत्येक गोष्टीचा आरंभ हा कायमच खास असतो. मग ते एकत्र बनवलेलं जेवण असो, एकत्र साजरा केलेला सण असो, लग्नानंतर घेतलेली गाडी असो वा घर असो किंवा मग पहिलंवहिलं भांडण असो. या सगळ्याच गोष्टी खूप खास असतात आणि प्रत्येकासाठीच. हेच सोनेरी दिवस पुन्हा अनुभवण्यासाठी प्रिया बापट आणि उमेश कामत लवकरच घेऊन येत आहेत ‘आणि काय हवं’ ही मराठी वेबसिरीज. या वेबसिरीजच्या निमित्तानं प्रिया आणि उमेश तब्बल सात वर्षांनी एकत्र काम करत आहेत. सहा भाग असलेल्या या वेबसिरीजचे दिग्दर्शन ‘मुरांबा’फेम वरुण नार्वेकर यांनी केले असून अनिश जोग आणि रणजीत गुगळे निर्माता आहेत.

आपल्या या अनुभवाबद्दल उमेश म्हणतो, ”प्रिया आणि मी सात वर्षांनंतर एकत्र झळकणार आहोत. आम्हाला एकत्र काम करण्याची खूप मनापासून इच्छा होती आणि या क्षणाची खरंतर आम्ही आतुरतेनं वाट पाहात होतो. दरम्यानच्या काळात आम्हाला ‘आणि काय हवं’बद्दल विचारणा करण्यात आली. आम्हाला ही संकल्पनाच इतकी आवडली, की आम्ही त्वरित होकार दिला आणि या वेबसिरीजचा भाग बनलो. यात लग्नानंतर घडणाऱ्या अनेक छोट्या तरीही मौल्यवान गोष्टी खूपच सुंदररित्या दाखवण्यात आल्या आहेत आणि मुळात हा तुम्हा-आम्हा सगळ्यांचाच अनुभव आहे त्यामुळे ही वेबसिरीज तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या खूप जवळची वाटेल.”

”ही गोष्ट तुमची आहे, माझी आहे.  एकंदरच लग्नसंस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाची आहे. लग्नानंतर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेत असतानाच रोज नव्याने प्रेमात पडणाऱ्या ‘साकेत’ आणि ‘जुई’ची ही कथा आहे. ‘आणि काय हवं’ची कथा अतिशय साधी, सोपी आहे आणि तरीही मनाला स्पर्शून जाणारी आहे. ज्याप्रमाणे ही कथा माझ्या मनाला भावली तशी ती तुम्हालाही नक्कीच आवडेल.”, अशी प्रतिक्रिया प्रिया बापटने दिली. तर या वेबसिरीजबद्दल दिग्दर्शक वरुण नार्वेकर म्हणतात, ‘ लग्नानंतर प्रत्येक जोडप्यानं एकत्र केलेल्या ‘पहिल्या’ गोष्टी मला या वेबसिरीजमध्ये दाखवायच्या होत्या. छोट्या छोट्या गोष्टीत एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न. अशा अनेक. यात मला प्रिया-उमेश सारखे कसलेले कलाकार लाभल्यानं आणि त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री पाहता त्यांचं प्रेम वेबसिरीजमध्ये दाखवणं माझ्यासाठी अधिकच सोपं झालं. त्यांनी ‘जाई’ आणि ‘साकेत’मध्ये जिवंतपणा आणला.”
ही वेबसिरीज १६ जुलैपासून एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे.

 

Exit mobile version