आनंदी हे जग सारे – सोनी मराठीवर २ डिसेंबरपासून सायंकाळी ७ वाजता
नवनवीन विषय घेऊन येणाऱ्या सोनी मराठीने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या प्रत्येक विषयाचे स्वत:चे असे आकर्षण असते. अशाच एका वेगळ्या विषयाची नवी गोष्ट सोनी मराठी घेऊन येत आहे. स्वमग्नता किंवा ऑटिझम या विषयावर फारसे बोलले जात नाही, पण एका मालिकेच्या माध्यमातून सोनी मराठीवर अशीच एक नायिका आपल्या भेटीला येत आहे. नावाप्रमाणे आनंदी असणाऱ्या एका गोड चिमुकलीची गोष्ट ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहे. २ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेतील मुख्य पात्र असलेली आनंदी ही स्वमग्न मुलगी आहे. आनंदीसारखी अनेक मुले आपल्या आजूबाजूला असतात. अशा मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दष्टीकोन वेगळा असतो. प्रत्येक जण आपल्या चष्म्यातून या मुलांकडे पाहत असतो. निसर्गाने आनंदीकडे सुद्धा खासियत दिलेली आहे. सोनी मराठीवर आपल्या भेटीला येणाऱ्या आनंदीकडे असे काही अचाट गुण आहेत. आनंदीची गणित आणि आकडेमोडीची क्षमता अविश्वसनीय आहे.
प्रत्येक मूल जसे आपल्या आईसाठी खास असते, तशीच आनंदीही तिच्या आईची लाडकी आहे. त्यांच्या नात्याची झलक आपण प्रोमोच्या माध्यमातून पाहू शकतो. मात्र स्वविश्वात रमणाऱ्या ऑटिस्टिक आनंदीला सामाजिक व्यवहाराचं, चाली-रितींचं, वागण्या-बोलण्याचं मोजमाप घेऊन बसलेल्या काही महाभागांचा सामनाही करावा लागतो. तिला समजून घेण्यात आजूबाजूची मंडळी कमी पडतात, पण त्यातही आनंदी सर्वांचं जीवन तिच्या निरागसेतेने आनंदमय करते. या आनंदीची ही गोष्ट प्रेक्षकांसमोर सादर करणार्या कलाकारांची फौजही तितकीच दिग्गज आहे. लीना भागवत, ऋजुता देशमुख, शैलेश दातार, आस्ताद काळे, उदय सबनीस, शिल्पा नवलकर, संग्राम समेळ, शर्वरी कुलकर्णी ही मंडळी या मालिकेत दिसणार आहेत. चिमुकल्या आनंदीची भूमिका राधा धारणे हिने साकारली आहे.
आनंदीचं स्वत:चं असं भावविश्व आहे. तेव्हा या विश्वात आनंदी व्हायला नक्की पहा २ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता ‘आनंदी हे जग सारे’ फक्त, सोनी मराठीवर.