‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर बॉलिवूड सिनेमा ‘मलंग’ मध्ये दिसणार अमृता खानविलकर
अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडीयावर सुपर ऍक्टिव्ह अशी मराठमोळी अभिनेत्री कोण असं जरी विचारलं तरी क्षणात अनेकांचं अचूक उत्तर असेल ‘अमृता खानविलकर’. मराठी इंडस्ट्रीमध्ये अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्ये देखील होत असते. अमृताने साकारलेल्या प्रत्येक भूमिका आणि तिचे डायलॉग्स तिच्या चाहत्यांना अगदी तोंडपाठ असतात. आणि आता यामध्ये नव्याने भर पडणार आहे कारण अमृताचा नवीन सिनेमा लवकरच येतोय. विशेष म्हणजे ‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर अमृताला पुन्हा एकदा हिंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे.
मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ या सिनेमातील स्टार कास्ट आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत अमृता खानविलकर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अमृताची ‘मलंग’ झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील यात शंका नाही.
मराठीसह हिंदी सिनेमांत देखील अमृताने तितक्याच ताकदीने प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीने पडद्यावर साकारल्या आहेत. केवळ सिनेमेच नाही तर हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील उत्तम काम केले आहे. आतापर्यंत केलेल्या कामाची पावती अमृताला वारंवार तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरुन मिळत राहिल्या आहेत आणि पुढेही मिळतील हे नक्की.