रणवीर सिंगचे तेजस्विनी पंडितला दिवाळी गिफ्ट
रणवीर सिंगवर लाखो तरूणी फिदा आहेत. त्याला भेटायची इच्छा अर्थातच अनेकजणींना होत असेल. पण जेव्हा रणवीर सिंगच भेटायची इच्छा प्रकट करतो, तेव्हा?.. ‘गुलाबीच कळी’ अभिनेत्री तेजस्विनी पंडित रणवीर सिंगची चाहती आहे. तेजस्विनीचा मित्र अभिनेता सिध्दार्थ जाधवला ही गोष्ट चांगलीच ठाऊक आहे. म्हणूनच सिंबाच्या सेटवरून सिध्दार्थने त्याची ‘बंड्या’ अर्थातच तेजस्विनी पंडितसाठी रणवीरचा एक खास मेसेज रेकॉर्ड करून तिला दिवाळीचं सरप्राइज दिलं. ह्या मेसेजमध्ये रणवीरने चक्क तिला भेटायची इच्छा व्यक्त केली.
ह्याविषयी तेजस्विनी पंडित म्हणते, “सध्या मी नि:शब्द झालीय. रणवीरची मी खूप काळापासून चाहती आहे. आणि ही गोष्ट सिध्दुला चांगलीच माहित होती. तो सध्या सिंबाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. आणि अनपेक्षितपणे त्याने मला दिवाळीला खुद्द रणवीरचा माझ्यासाठीचा मेसेज रेकॉर्ड करून पाठवला.”
सिंबाच्या सेटवरच्या सूत्रांच्या माहितीनुसार, सिध्दार्थ आणि रणवीरच्या मराठी सिनेसृष्टी आणि सिनेमाविषयीच्या अनेकदा गप्पा रंगतात. आणि ह्या गप्पांच्या ओघात सिध्दार्थ जाधवने रणवीरला तेजस्विनी पंडितविषयी सांगितले. रणवीरने तेजस्विनीविषयी लगेच गुगलवर करून माहिती काढल्यावर, त्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिंधुताई सकपाळ चित्रपाटाची नायिका तेजस्विनी होती, हे कळले. आणि मग त्याने लगेच सिध्दार्थकडून तेजस्विनीला व्हिडीयो पाठवून तेजस्विनीला भेटायची इच्छा व्यक्त केली.
रणवीरच्या ह्या ‘स्पेशल जेस्चर’ने अर्थातच तेजस्विनी पंडितची दिवाळी खास झाली.