लव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने 10 किलो वजन वाढवले!
ब्लॅक एन्ड व्हाइट, गजनी आणि हंटर अशा बॉलीवूडपटांमधून दिसलेली सई ताम्हणकर आता लवकरच तबरेज नुरानी दिग्दर्शित लव सोनिया ह्या इंडो-वेस्टर्न सिनेमामध्ये झळकणार आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेसोबत समरसून जाऊन चित्रपटाला योग्य न्याय देणारी सई ताम्हणकरने आपल्या ह्या नव्या सिनेमासाठीही भरपूर मेहनत घेतली आहे.
लव सोनिया सिनेमातली अंजली वेश्याव्यवसायातली दलाल असते. अशा व्यक्तिची भूमिका करताना सईला खूप तयारी करावी लागली. ती म्हणाली, “आजपर्यंत मी रंगवलेल्या भूमिकांपेक्षा अंजली खूपच वेगळी होती. अशा महिलांना मी कधीही भेटलेही नव्हते. त्यांची देहबोली आत्मसात करताना काही निरीक्षणे आणि संशोधन केले. मला साडी नेसायची होती. ह्या व्यवसायात असलेल्या स्त्रिया जेव्हा साडी नेसतात तेव्हा त्यांच्या पोटाकडचा आणि पाठीकडचा भाग उघडा असतो. ब्लाउज ब-याचदा व्यवस्थित फिटींगचे नसतात. आणि त्यातून त्यांचे जागरणे किंवा अवेळी जेवणाने वाढलेले वजन प्रकर्षाने दिसून येत असते, हे उमगले.”
सई पूढे सांगते, “कॉस्च्युम डिझाइनर शाहिद आमिर ह्यांनी ब्लाउज डिझाइन करताना ते मुद्दामहून मापाचे नसतील, किंवा ते पाठीकडच्या भागातून थोडे वर जातील असेच डिझाइन केले होते. आता मला माझे वजन वाढवणे गरजेचे होते. वेट गेन करताना सुटलेले शरीर दिसणे आणि आकारमान बेढब असणे ह्यावर लक्ष केंद्रित केले. लव सोनियासाठी मी जवळ-जवळ 10 किलो वजन वाढवले होते.”