Marathi News
” ‘मन हे वेडे….’ अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर ”
” मन हे वेडे का पुन्हा, सांग ना…तुझ्यातच दिसते का पुन्हा, सांग ना…|
मानवी मनाच्या विविधस्पर्शी भावना आर्त स्वरात व्यक्त करणारा ‘मन हे वेडे….’ हा अल्बम प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या हृदयस्पर्शी गीताचे नुकतेच मुंबईतील ‘एम स्क्वेअर’ स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण करण्यात आले. कवयित्री वैशाली मराठे यांनी लिहिलेल्या गीताला जीवन मराठे यांनी संगीत दिले असून प्रसिद्ध गायिका अन्वेषा हिने या गीताला स्वरसाज चढविला आहे. संगीत-संयोजन सत्यजित केळकर यांचे आहे. या अल्बमची निर्मिती श्रीनिवास गोविंद कुलकर्णी यांनी केली असून तांत्रिक सोपस्कारानंतर तो लवकरच प्रदर्शित होईल अशी माहिती त्यांनी दिली.
कुमार वयातच ‘छोटे उस्ताद’ या गाजलेल्या कार्यक्रमातून पुढे आलेली गायिका अन्वेषा दत्ता ही मूळची बंगाली असली तरी तिने आतापर्यंत विविध भाषांमधील गाणी गायली आहेत. यापूर्वी अन्वेषाच्या आवाजातील ”तुझ्या विना ……” या मराठी अल्बमला रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. ‘मन हे वेडे….’ या अल्बममधील गाणे देखील तिने अतिशय तरल आवाजात गायले असून हा अल्बम देखील रसिकांना आवडेल असा विश्वास निर्मात्यांनी बोलून दाखविला.