स्वप्नील-सुबोधच्या मैत्रीत दरार पाडणार प्रार्थना !
आगामी ‘फुगे’ या सिनेमाची सध्या मोठी चर्चा होत आहे. दोन जिवलग मित्रांची रंगीत दुनिया मांडणारा हा सिनेमा रसिकांचे भरघोस मनोरंजन करणारा ठरणार आहे. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांच्या प्रेमाची बेकस्टोरी सांगणाऱ्या या सिनेमाची नायिका कोण? या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला. दोन मित्रांच्या मैत्रीत दरार पाडण्यासाठी आणि कहाणीत खुमासदार ट्विस्ट येण्यासाठी ‘फुगे’ मधील ही नायिका महत्वपूर्ण ठरणार आहे. हि नायिका म्हणजेच मराठी सिनेसृष्टीतील बबली गर्ल प्रार्थना बेहरे.
या सिनेमात प्रार्थना स्वप्नील- सुबोधच्या मैत्रीत हस्तक्षेप करणार आहे. नेहमीच आपल्या प्रियकराला आपल्या मर्जीत ठेऊ इच्छिणाऱ्या आणि सतत डॉमिनेट करणाऱ्या टिपिकल गर्लफ्रेंडच्या भूमिकेत ती ‘फुगे’ मध्ये दिसणार आहे. यात तिची ‘ही जाई हर्डीकर’ नावाची व्यक्तिरेखा असून, ती स्वप्निलच्या प्रेयसीच्या भूमिकेत लोकांसमोर येणार आहे. आपल्या भावी नवऱ्याचे त्याच्या मित्रासोबतचे असलेले नाते तिला आवडत नाही, अशावेळी कोणत्या ना कोणत्या कारणांनी या दोघांमध्ये नेहमीच आडवी येणारी ही जाई स्वप्नील (आदित्य अग्निहोत्री) आणि सुबोध (ऋषिकेश देशमूख) च्या मैत्रीत कशी आडवी येते हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.
विशेष म्हणजे जिवलग मित्र आणि गर्लफ्रेंड या दोघांमध्ये अडकलेल्या आजकालच्या तरुणांची मानसिकता या सिनेमात पाहायला मिळणार आहे. मित्राला सोडवत नाही आणि प्रेयसीला दुखावता येत नाही अशा दोन भावनिक गुंतागुंतीत होत असलेली तारेवरची कसरत ‘फुगे’ मध्ये दिसणार आहे. ‘फुगे’ या सिनेमाची निर्मिती एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांनी केली असून इंदर राज कपूर या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. या सिनेमाच्या अतरंगी नावामुळेच चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मोठी प्रसिद्धी मिळत आहे.स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित या सिनेमात खास करून स्वप्नील आणि सुबोध मधला याराणा या या चित्रपटाला वेगळ्याच टप्प्यावर घेऊन जात आहे. आता त्यांच्यातला हा याराना संपवण्यात प्रार्थना काय शक्कल लढवते हे सिनेमा २ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाल्यावर समजेल