एकमेकांबद्दल प्रेमाची भावना असल्याची जाणीव झाली.
होळी हा रंगाचा खेळ आहे. मी स्वतः एक पेंटर असल्यामुळे मला रंग खूप आवडतात. होळीच्या दिवसात कॅनव्हास सुंदर पेंटिंग करायला मला आवडेल. सहसा मी होळी खेळत नाही, आणि जर खेळलो तर सुक्या रंगाला मी प्राधान्य देतो. पाण्याचा अपव्यय होईल असे मी काही करत नाही. पण हो होळीच्या दिवसात बनवली जाणारी पुरणपोळी मला खूप आवडते. होळीची एक सुंदर आठवण माझ्याकडे आहे. होळीच्याच दिवशी माझ्या हिंदी मालिकेच होळीवर आधारित पहिलच शूट सुरु झालं होत. माझी पत्नी रिद्धी त्या मालिकेत माझी को-स्टार होती. आम्ही पूर्वीपासून एक चांगले मित्र होतो, पण तो दिवस काही खासच होता…होळीचे शॉट देत असताना, एकमेकांबद्दल प्रेमाची भावना असल्याची जाणीव झाली. माझ्या आगामी वृंदावन सिनेमासाठी ही होळी खास असणार आहे. मराठीत प्रथमच मी ‘वृंदावन’ मधून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. होळीच्या रंगाप्रमाणे माझा हा सिनेमादेखील लोकांच्या आयुष्यात रंग भरेल अशी मी आशा व्यक्त करतो.
अभिनेता- राकेश बापट
———————————————————————————————————
रंगांची नव्हे सुरांची होळी
माझे स्वतःचे व्यक्तिमत्व इको- फ्रेंडली असल्यामुळे मी रंगांची होळी कधीच खेळत नाही. रंगांमुळे आणि धुळीमुळे माझ्या घशाला त्रास होतो, त्यामुळे मी अशा कार्यक्रमात देखील जाण्यास टाळते. त्यापेक्षा मी सुरांची होळी खेळते. मी गायिका असल्यामुळे रंगांपेक्षा विविध सुरांची उधळण करायला मला आवडते. या सणांच्या निमित्ताने होळी वर आधारित अनेक जुनी गाणी आणि भजन ऐकायला मिळतात. मीराचे ‘केनु संगे खेलू होली’ हे कानाला सुमधुर वाटणारे भजन देखील त्यावेळी ऐकायला मिळते. शिवाय नकारात्मक गोष्टी होळीत वाहून देत सकारात्मकतेचा अवलंब करण्याची संकल्पना होळी सणाविषयी आहे. त्यामुळे रंगपंचमीच्या आदल्या दिवशी होणा-या होळी दहन पूजनात मी आवर्जून भाग घेते. यंदाची होळी माझ्यासाठी डबल बोनस घेऊन येणार आहे. माझ्या ‘फोटोकॉपी’ सिनेमाचं नुकतचं पोस्टप्रॉडक्शन पूर्ण झाले आहे, त्यामुळे प्रदर्शनाची योजना लवकरच आखणार आहोत. तोवर सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा.
गयिका / निर्माती -नेहा राजपाल
——————————————————————————————————-
होळी म्हणजे गेटटुगेदर
होळी सणाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतात. या सणाच्या निमित्ताने सिने इंडस्ट्रीचे कलाकार मंडळी आम्ही एकत्र भेटतो. कामात व्यस्त असल्याकारणाने एरव्ही कोणाची भेट होत नाही, मात्र होळीच्या निमित्ताने ठरवून एकत्र भेटण्याचा बेत आखला जातो. त्यामुळे माझ्यासाठी होळी म्हणजे मोठे गेटटुगेदरच आहे. मी होळीत सुक्या रंगाला अधिक प्राधान्य देईन.यंदा पाणी प्रश्न केवळ शेतक-यांनाच नव्हे तर शहरात देखील मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. त्यामुळे पाण्याची होळी खेळताना या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. पाण्याचा अपव्यव टाळला तरच पृथ्वी ‘वृंदावना’ सारखी बहरू शकेल.
संगीत दिग्दर्शक – अमितराज
—————————————————————————————————–
होळी म्हणजे पुरणाची पोळी
लहानपणापासून होळी होळी पुरणाची पोळी असं ऐकलय. होळी म्हंटली तर पुरणाची पोळी ही आलीच! होळी दहनाच्या आधी पुरणपोळीचा नैवेद्य आणि नारळ वाहिला जातो. त्यामुळे या सणाला पुरणपोळीचा मोठा मान असतो. तसेच होळीत टाकलेला नारळ होळी विझल्यानंतर फोडून एकत्र वाटून खाण्याची मज्जा काही औरच होती! आजही मला ते लहानपणीचे क्षण आठवतात. सर्व कुटुंबांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा हा सण आहे. आम्ही सर्व भावंड एकत्र आमच्या पुण्याच्या घरात रंगपंचमी खेळायचो. लग्नानंतर मुंबईत आल्यानंतरही होळीचा आनंद मी साजरा करते आहे. महाराष्ट्रात सध्या दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे पाण्याचा वापर न करता होळी खेळण्याचा माझा संकल्प आहे.
अभिनेत्री -रीना वळसंगकर -अगरवाल
———————————————————————————————————
होळीत मुक्या प्राण्यांची काळजी घ्या
मला रंग खूप आवडतात त्यामुळे विविध रंगांची उधळण करणारा होळी हा सण मला तितकाच आवडतो. होळी ही पाण्याने खेळण्याऐवजी सुक्या रंगानी खेळावी, कारण होळी ही रंगांचं प्रतिक असते. होळी खेळताना आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची मात्र काळजी घ्यावी. मुख्यतः मुक्या प्राण्याची काळजी घ्या. होळीच्या रंगांमुळे त्यांना त्रास होऊ शकतो. माझ्यासाठी होळी म्हणजे फॅमिली टाईम आहे. दरवर्षी होळी सणाला आम्ही सर्व नातेवाईक एकत्र भेटून सण साजरा करतो. माझा आगामी ‘रेती’ हा सिनेमा वाळू माफियांवर आधारित आहे. बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणावर भाष्य करणारा हा सिनेमा होळीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर तो सर्वत्र प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना माझा रेती हा सिनेमा आवडेल अशी मी आशा करते.
अभिनेत्री – गायत्री सोहम
——————————————————————————————————–
पारंपारिक शिमगोत्सव जपणार कोकण
होळी म्हणजे आमच्या कोकणात शिमगा होतो. शिमग्याला मागच्या वर्षी पहिल्यांदाच कोकणात गेले होते. तिथे ख-या अर्थाने शिमगोत्सव म्हणजे काय ते समजले. आपल्या मुंबईत तसेच आजकालच्या जनरेशनला अशी होळी माहित नाहीये. संपूर्ण गावाची ती होळी असते, अखंड गाव त्यावेळी एकत्र येऊन शिमगोत्सव साजरा करतं. होळीसमोर गा-हाण घालण्याची आणि आरोळी ठोकण्याची पद्धत ही असते. त्यामुळे भोवतालची सर्व निगेटिव्ह एनर्जी होळीत दहन होते, असे मानले जाते. होळीची पारंपारिकता आणि उद्दिष्ट जपणारा शिमगा केवळ कोकणातच पाहायला मिळेल. आयुष्यात सकारात्मकता येण्यासाठी आणि दूर गेलेल्या प्रेमीजनांना पुन्हा जवळ आणण्यासाठी अशा सणांची नितांत आवश्यकता असते. तेव्हाच जीवन ‘वृंदावन’ सारखे सुंदर होते. माझा आगामी सिनेमा ‘वृंदावन’ हाच संदेश देतो.
अभिनेत्री- पूजा सावंत
———————————————————————————–
होळी म्हणजे उत्साह
होळी हा उत्साहाचा आणि नाविन्यतेचा सण आहे. सर्वाना एकत्र आणून एकाच रंगात न्हाऊन टाकणारा हा सण आहे. या सणाला कोणत्याही जातीचा रंग नसतो, प्रत्येक धर्माचे आणि जातीचे लोक एकत्र येऊन होळीत माणुसकीचा रंग चढवू शकतात. आपल्या स्वकीयांसोबत सण साजरा करण्याची मज्जा माझ्याहून चांगली कोण सांगणार? १० वर्ष शिक्षणासाठी मी घरापासून दूर होतो. होळीच्या निमित्ताने मला माझी माणस पुन्हा भेटायची. त्यात पुरणपोळीची लज्जत देखील असायची. शिवाय आज अनेक माणसं माझ्या या कुटूंबात दाखल झाली आहेत. “फोटोकापी” या माझ्या सिनेमाच नुकतच चित्रीकरण पुर्ण झालं असून, सेटवरचे प्रत्येकजण माझ्या कुंटूंबाचा भाग झाली आहेत. यावर्षीची होळी त्यांसोबत मी खेळणार आहे.
अभिनेता -चेतन चिटणीस