‘खारी बिस्कीट’ला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळणे, हे संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फळ – दिपक पांडुरंग राणे
दिपक पांडुरंग राणे निर्मित ‘खारी बिस्कीट’ चित्रपटाला ‘सिटी सिने अवॉर्ड्स’मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. ब-याच काळानंतर खारी बिस्कीट चित्रपटामूळे मराठी सिनेमासाठी ‘हाउसफुल’चे बोर्ड सर्वत्र झळकले होते. हा सिनेमा कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. आणि आता रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे खारी बिस्कीट सिनेमावर सिनेसृष्टीतील नामांकित पुरस्कार सोहळ्यांमध्ये पुरस्कारांची बरसात होताना दिसतेय.
नुकत्याच झालेल्या सिटी सिने अवॉर्ड्समध्ये खारी बिस्कीटला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संगीत-दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट गीतकार, आणि सर्वोत्कृष्ट सिनेमा अशा पाच पुरस्करांनी खारी बिस्कीट चित्रपटाला गौरवण्यात आले आहे.
2020च्या प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात खारी बिस्कीट चित्रपट आपली मोहर उमटवताना दिसतोय. ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ पुरस्कार सोहळ्यातही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट गीत, सर्वोत्कृष्ट गायिका असे चार पुरस्कार खारी बिस्कीटला मिळाले होते. तर सकाळ प्रिमीयर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार. सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन, आणि सर्वोत्कृष्ट छायांकन असे पाच पुरस्कार खारी बिस्कीट सिनेमाला मिळाले होते.
खारी बिस्कीट सिनेमाचे निर्माते दिपक पांडुरंग राणे ह्या सिनेमाचा होत असलेला गौरव अनुभवताना भारावून जात म्हणाले, “सिनेमाला प्रत्येक अवॉर्ड फंक्शनमध्ये गौरवले जात आहे. ही माझ्यासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार हे तर संपूर्ण टीमच्या मेहनतीचं फळं आहे. रसिकांनी दिलेल्या भरभरून प्रेमाचेच हे प्रतिक आहे. सिनेमागृहांच्याबाहेर लागलेल्या हाऊसफुलच्या बोर्ड्सनंतर आता नामांकित पुरस्कार सोहळ्यांमधूनही आमची पाठ थोपटली जातेय. त्यासाठी मी रसिक प्रेक्षकांचा खूप आभारी आणि ऋणी आहे. अशा पुरस्कांमूळे काम करण्याची एक नवीन उर्जा येते. “