सर्वोत्तम जीवन जगण्याचा मूलमंत्र देणारा मराठी सिनेमा ll श्री राम समर्थ ll
लहानपणापासून मनावर कोरलेले मनाचे श्लोक हा राष्ट्रीय संत रामदास स्वामींनी दिलेला अमूल्य ठेवा घराघरात गेल्या कित्येक पिढ्यांपासून जपला जात आहे. त्यांनी लिहून ठेवलेला ‘दासबोध’ ग्रंथ आजच्या कठीण परिस्थितीत मार्गदर्शक ठरतो. त्यांच्या मार्गदर्शनाचे अनेक पैलू ”श्री राम समर्थ” या समर्थ रामदास स्वामी यांच्या चरित्रपटात उलगडणार आहेत. नाशिक च्या सुप्रसिद्ध वकील सौ विजया माहेश्वरी यांच्या संकल्पनेतून आणि श्री प्रकाश सुरवसे यांच्या अथक प्रयत्नातून साकारलेल्या तसेच दिशा दिपा फिल्म्स (दिपा सुरवसे) आणि विप्र एंटरटेनमेंट (अश्विनी माहेश्वरी) यांची निर्मिती असलेल्या ”श्री राम समर्थ” या चित्रपटाचा पोस्टर आणि ट्रेलर अनावरण सोहळा नामांकित कलाकार अलका कुबल, शंतनू मोघे, नाशिक मधील हौशी कलाकार आणि समाजातील इतर अनेक प्रतिष्ठित्यांच्या उपस्थितीत महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे नुकताच पार पडला. या प्रसंगी संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे, त्रंबक चे नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, चित्रपट निर्माते सुधीर कोलते, बडगुजर, तुषार गुप्ते, विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, महर्षी चित्रपट संस्थेचे निशिकांत पगारे, प्रा. सोमनाथ मुठाळ आदी मंडळी उपस्थित होती.
शुभ लग्न ”सावधान” या शब्दामागील नेमके अर्थ समजावून देणारा अवघ्या १२ वर्षाचा छोटा नारायण ते अफाट ज्ञान आणि रामरायाच्या भक्तीत आकंठ बुडून प्राप्त केलेली सिद्धी हे संत रामदास स्वामींच्या आयुष्याचे फार मोठे विशेष लक्षण आहे .स्त्रियांचा आदर आणि महिला सबलीकरणाचे समर्थ खरेखुरे पुरस्कर्ते होते हे देखील सिनेमात पाहण्यास मिळते. स्वच्छ परिसर आणि समृद्ध समाज ही संकल्पना त्यांनी चारशे वर्षांपूर्वी समाजात रुजविली हाेती जी आजही तितकीच महत्वपूर्ण ठरत आहे व भरकटलेल्या समाजास त्यांनी सतत वैचारिक मार्गदर्शन केले आहे.
बहुचर्चित सिनेकलाकारांच्या उत्तम आणि खुमासदार अभिनयामुळे या सिनेमाला एक वेगळीच लकाकी मिळाली आहे. हा सिनेमा रामदास स्वामींच्या चरित्रपटापेक्षा तत्कालीन तसेच आजच्या समाजातील परिस्थितीचे नेमके आणि मार्मिक वर्णन करणारा आहे. सिनेमात दाखविलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना उत्तम प्रशासन आणि प्रशासक कसे असावे याबद्दल नेमके भाष्य करतात. दिग्दर्शक संतोष तोडणकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ”श्री राम समर्थ” या सिनेमाची प्रस्तुती भारती झुंबरलाल राठी आणि संजय राठी यांनी केली आहे. कथा- पटकथा – संवाद प्रकाश जाधव, मनोज येरुणकर, विठ्ठल आंबुरे यांनी केले आहे. छायांकन समीर आठल्ये, संकलन सुबोध नारकर, कला महेंद्र राऊत, संगीत महेश नाईक आणि संजय मराठे यांनी दिले आहे. परिपूर्ण जीवनाचा मूलमंत्र देणारा असा हा llश्री राम समर्थ ll सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तमाम विचारी प्रेक्षकांसाठी हा सिनेमा रंजक तसेच उदबोधक आणि प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. कार्यक्रमानंतर प्रेक्षकांनी चित्रपट लवकर प्रदर्शित व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली व आतुरतेने वाट पाहत असल्याची चर्चा सर्वत्र होती.