44 वर्षानंतर घायाळ हरिणी प्रेक्षकांना मोहिनी घालण्यासाठी पुन्हा सज्ज – रणांगण चित्रपटातून येणार नवं स्वरूप समोर
सख्या रे घायाळ मी हरिणी… सामना चित्रपटातून लता दीदींनी घातलेली ही साद… आजही आपल्याला मोहीत करते. एक वेगळीच उंची गाठलेलं हे गाणं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मोहिनी घालण्यासाठी सज्ज झालं आहे. या गाण्याचं नवं स्वरुप नुकतंच लाँच झाल असून आगामी रणांगण या चित्रपटातून हे गाणं आपल्यासमोर येणार आहे.
तसं बघायला गेलं तर एखादी नवीन कलाकृती बनवणं सोपं असतं पण लाखों संगीतप्रेमींच्या मनात घर केलेल्या एखाद्या गाण्याचे काही शब्द घेऊन त्याभोवती तितक्याच ताकदीचं नवं गाणं गुंफणं एक आव्हान असतं. हेच आव्हान लिलया पेलत गुरू ठाकूर यांनी सख्या रे घायाळ मी हरिणी… या अजरामर ओळींभोवती नवे शब्द ओवले तर राहुल रानडे यांनी आपलं संगीत कौशल्य वापरून त्या ओळींना गाण्याचं स्वरूप दिलं. तर हे सुंदर गीत आनंदी जोशी हीने आपल्या स्वरांनी सजवलं आहे.
कानांना सुखावणार हे गीत 52 विक्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) आणि हार्वे फिल्म्स निर्मित रणांगण या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली असून सहनिर्मिती अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी केली आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन राकेश सारंग यांनी केलं आहे.
या चित्रपटात सिनेसृष्टीतील दिग्गज सचिन पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी एकमेकांसमोर उभे आहेत तर सिध्दार्थ चांदेकर आणि प्रणाली घोगरेच्या निमित्ताने एक गोड प्रेमकथा या चित्रपटाचा भाग आहे. त्याशिवाय सुचित्रा बांदेकर आणि आनंद इंगळे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हा चित्रपट येत्या 11 मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.