‘१७ व्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी’ नाट्यमहोत्सव संपन्न

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा विविध स्तरावरील कलाकृतींचा आणि कलावंतांना गौरविणाऱ्या संस्कृती कलादर्पणचा नुकताच मोठ्या दिमाखात नाट्यसोहळा पार पडला. ८ ते १० एप्रिल दरम्यान माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात पार पडलेल्या या महोत्सवाची सांगता ‘कोडमंत्र” या नाटकाद्वारे झाली. तत्पूर्वी ८ एप्रिलला सुरु झालेल्या या नाट्यमहोत्सवाला उपस्थित असणा-या मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला होता. यंदाचे संस्कृती कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळ्याचे हे १७ वे वर्ष असून, सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील नाट्यरसिकांचा या महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभला. यावर्षीच्या १७ व्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी नाट्यसोहळ्यात रेखा सहाय, प्रमोद पवार, सविता मालपेकर, प्राजक्ता कुलकर्णी, मिलिंद गवळी, उदय धुरन, सुप्रिया पाठारे, रमेश मोरे आणि संजिव देशपांडे हे मान्यवर उपस्थित होते. यंदा नाट्यविभागातून अंतिम फेरीसाठी सात नाटकांची निवड झाली असून, यात साखर खाल्लेला माणूस (एकदंत निर्मित), कोडमंत्र (अनामिका निर्मित), ह्या गोजिरवाण्या घरात (वेद प्रॉडक्शन), छडा(अवनीश प्रॉडक्शन), यु टर्न २ (जिव्हाळा निर्मित), तीन पायांची शर्यत(सुयोग /झेलू निर्मित), के दिल अभी भरा नही (वेद प्रॉडक्शन)  या नाटकांचा समावेश आहे.  एकूण २४ नाटकांनी यात सहभाग घेतला होता. नाट्यपरिक्षण विभागातील कांचन अधिकारी, प्राजक्ता कुलकर्णी आणि प्रमोद पवार यांनी यंदाच्या नाट्यस्पर्धेच्या परिक्षणाची धुरा सांभाळली आहे.
 या महोत्सवाच्या निमित्ताने प्राथमिक निवड झालेल्या कलाकृतीच्या कलाकार मंडळीसोबत अगदी माफक दरात नाटकांचे प्रयोग पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे यंदा प्रेक्षकांसाठी सेल्फी कॉर्नर ही स्पर्धादेखील राबविण्यात येत असून, यात विजेते ठरलेल्या निवडक प्रेक्षकांना ७ मे रोजी होणाऱ्या संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१७ च्या पुरस्कार सोहळ्याचे पास मिळणार आहे.  तसेच लवकरच चित्रपट विभागातील पुरस्कार सोहळ्यासाठी सर्वोकृष्ट १० चित्रपटांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती संस्कृती कलादर्पण अध्यक्ष -संस्थापक चंद्रशेखर सांडवे आणि अध्यक्षा अर्चना नेवरेकर यांनी दिली.

 

Exit mobile version