ह.म.बने तु. म.बने कुटुंबात साजरा होणार लता दीदींचा वाढदिवस
४० च्या दशकापासून जिचा आवाज संगीतक्षेत्रात घुमतो आहे, अशी गानसम्राज्ञी लता मंगेशकर २८ सप्टेंबरला ९० वर्षांच्या होत आहेत. लता दीदींच्या याच कारकीर्दीला सलाम करत सोनी मराठीने ह.म.बने तु.म.बने मालिकेच्या माध्यमातून लता दीदींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या विशेष भागाची बांधणी लता-गीतांनी केली आहे.
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला साजेसं गाणं लता दीदींनी आपल्या सुरेल कारकीर्दीत गायलं आहेच. ज्याचा अचूक वापर ह.म.बने तु.म.बने मालिकेच्या या स्पेशल भागात पाहायला मिळणार आहे. स्वरसम्राज्ञीच्या गीतांनी बहरलेला हा भाग विशेष ठरणार आहे गीतांमधून होणाऱ्या संवादासाठी. आजपर्यंत कोणतीही मालिका संवादाशिवाय प्रक्षेपित केली गेली नव्हती. मात्र सोनी मराठीवर लता दीदींच्या वाढदिवसानिमित्त सादर होणाऱ्या भागात एक नवा प्रयोग करताना आपल्याला दिसणार आहे. कोणताही संवाद नसलेल्या या भागात ह.म.बने तु.म.बने कुटुंबीय लता दीदींच्या गाण्यातून संवाद साधताना दिसणार आहेत.
बने आज्जी – अप्पांपासून ते पार्थ – रेहापर्यंत सगळ्यांच्या वयाला आणि भावनांना व्यक्त करतील अशी गाणी लता दीदींनी गायली आहेत. यापैकी नेमकी कोणती गाणी बने कुटुंबाच्या भावना व्यक्त करण्यास सहाय्यक ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहेत. तेव्हा ह.म.बने तु. म.बने अनोख्या पध्दतीत साजरा होणारा लता दीदींचा वाढदिवस नक्की पहा, २८ सप्टेंबरला रात्री १० वाजता फक्त सोनी मराठीवर.