Marathi News
सुपरहिट ‘बबन’ ने गाठला ८.५ कोटीचा पल्ला
द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत, चित्राक्ष फिल्म्स निर्मित आणि भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित ‘बबन’ या सिनेमाला मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले आहे. ग्रामीण भागाचा संघर्ष आणि रोमांचित प्रेमकहाणी सांगणाऱ्या या सिनेमाची ग्रामीण भागात विशेष दखल घेतली जात आहे. २३ मार्चपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने दहा दिवसांमध्ये ८.५ कोटीची बक्कळ कमाई केली आहे. राष्ट्रीयपुरस्कार प्राप्त चित्रपट ‘ख्वाडा’ च्या घवघवीत यशानंतर ‘बबन’ ला मिळत असलेल्या या उदंड प्रतिसादामुळे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याचीदेखील सर्वत्र चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या सिनेमातील अभिनेता भाऊसाहेब शिंदेने वठवलेली ‘बबन’ ची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडत असून, नवोदित अभिनेत्री गायत्री जाधव हिनेदेखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. ग्रामीण भागात या सिनेमाचा बोलबाला अधिक होत असून, मुंबईबाहेरील सिनेमागृहात ‘बबन’ हाऊसफुल ठरत आहे. ‘बबन’ सिनेमाच्या वाढत्या मागणीमुळे महाराष्ट्रात या सिनेमाचे शोजदेखील वाढवण्यातदेखील आले असल्याचे समजते. विशेष म्हणजे दर्जेदार कथानक आणि मांडणीसोबतच ‘बबन’ सिनेमातील गाणीसुद्धा हिट ठरली आहेत. त्यापैकी ‘मोहराच्या दारावर’ या गाण्यावर प्रेक्षक सिनेमागृहात ठेका धरतानादेखील काही ठिकाणी दिसून येतात. यासोबतच सिनेमातील इतर गाण्यांनीदेखील सिनेप्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले असल्यामुळे, अवघा महाराष्ट्र ‘बबन’ मय झाल्याचे पाहायला मिळत आहे.