News
सिनेमा आणि संगीत आई-बाबांसारखेच- नेहा महाजन
कॉफी आणि बरंच काही, मिडनाईट्स चिल्ड्रन आणि नीलकंठ मास्तर यांसारख्या सिनेमातून वैविध्यपूर्ण भूमिकेत दिसलेली नेहा महाजन तिच्या चाहत्यांना होळीच्या निमित्ताने लवकरच एक सरप्राईज देणार आहे. आतापर्यत केवळ अभिनेत्री म्हणून परिचित असणा-या नेहाला पुढे म्युजीशियन म्हंटले गेले तरी वावगे ठरणार नाही. याचे कारण म्हणजे, ती लवकरच होळीच्या निमित्ताने आपल्यातील म्युजिकवेड्या व्यक्तीचे दर्शन तिच्या चाहत्यांना करून देणार आहे.
होय, बोल्ड आणि ब्युटीफुल असणारी नेहाे एक उत्कृष्ट सितारवादक देखील आहे, हे तिच्या डायहार्ट चाहत्यांना देखील माहिती नसेल. नेहाने तिच्या अभिनयाबरोबरच आपला सितारवादनाचा छंद देखील झोपसला आहे..’संगीत आणि अभिनय यामध्ये मी एकाची निवड करू शकत नाही. आपल्या आयुष्यात आई-वडिलाचे जसे स्थान असते, तेच स्थान या दोघांचे माझ्या आयुष्यात आहे, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी मला खूप महत्वाच्या आहेत. असे ती स्पष्ट करते. माझे बाबा म्हणजेच पंडित विदुर महाजन माझे गुरु आहेत, आणि आजही मी त्यांच्याकडून सतार वादनाचे धडे घेते, असे ती पुढे सांगते.
येत्या सोमवारी ‘चला हवा येऊ द्या’ च्या होळी विशेष भागात नेहाची हि वेगळी छटा आपल्याला पाहायला मिळणार आहे. होळीच्या निमित्ताने नेहाचा हा वेगळा अंदाज तिच्या चाहत्यांसाठी विशेष ठरणार आहे.