साई गुंडेवार ची “अ डॉट कॉम मॉम” – 30 सप्टेंबर ला होणार भेट
पीके, डेव्हिड, आय मी और मै आणि युवराज या हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आलेला मराठमोळा चेहरा म्हणजे साई गुंडेवार…हा मराठमोळा सर्व्हायव्हर आता मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अ डॉट कॉम मॉम हा त्याच्या पदार्पणातला पहिलाच चित्रपट… आपल्या मराठी पदार्पणासाठी एक युनिव्हर्सल सब्जेक्ट मिळाल्यामुळे साई भलताच आनंदात आहे. आपल्या भूमिकेविषयी बोलताना, “आई मुलाचे भावनिक बंध उलगडणारा हा चित्रपट असून यात फोकस्ड, कष्टाळू आणि आपल्या आई आणि बायकोवर खूप प्रेम करणाऱ्या मुलाची भूमिका साकारत असल्याचे,” तो म्हणाला.
सुंदरा मनामध्ये भरली आणि अवघा रंग एकचि झाला अशी दर्जेदार नाटके मराठी नाट्यसृष्टीला देणाऱ्या डॉ. मीना नेरूरकर यांची निर्मिती असलेल्या “अ डॉट कॉम मॉम” या चित्रपटात या साध्या मुलाची साधी भोळी आई डॉ. मीना नेरूरकर यांनी साकारली आहे. गेली अनेक वर्ष त्यांनी रविवारच्या सामना या दैनिकात तर लोकप्रभा या मासिकात लिखाण केले, तसेच ‘धन्य ती गायनॅक कला’ आणि ‘ठसे माणसांचे’ यांसारखी पुस्तकेही लिहिली. आपल्या मुलाच्या आग्रहाखातर ही मल्टी टॅलेंटेड आई परदेशात जाते आणि तिथल्या संस्कृतीशी जुळवून घेताना तिच्यासमोर येणाऱ्या अडचणी आणि त्यातून घडणाऱ्या गंमती – जमती आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
या सिनेमाच्या निर्मिती – दिग्दर्शनाबरोबरच संवाद, गीत आणि कोरिओग्राफी ही डॉ. मीना नेरूरकर यांची असून या चित्रपटाचे संकलन सुनील जाधव यांनी केले आहे. कायान प्रॉडक्शन या बॅनरखाली अ डॉट कॉम चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून जीसिम्सचे अर्जुन सिंग बर्हान आणि कार्तिक निशानदार हे या चित्रपटाचे प्रेझेंटर आहेत. तर श्यामची आई नंतर आता साईची आई येते आहे येत्या 30 सप्टेंबरला…