संजय जाधव ह्यांचा ‘लकी’ येतोय 7 डिसेंबरला !
फिल्ममेकर संजय जाधव ह्यांनी सोशल मीडियावरून आपल्या ‘लकी’ ह्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेल्या ‘लकी’ सिनेमाचे दिग्दर्शन संजय जाधव करणार आहेत.
म्युझिक आणि इव्हेंट्स क्षेत्रात नावजलेले बी लाइव्ह प्रोडक्शन्स ‘लकी’ सिनेमाव्दारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. ह्यासंदर्भात बी लाइव्ह प्रोडक्शन्सचे संचालक आणि लकी सिनेमाचे निर्माते सुरज सिंग म्हणतात, “आमच्या निर्मितीसंस्थेला मराठी चित्रपटनिर्मितीत उतरण्याची ब-याच काळापासून इच्छा होती. संजय जाधव हे मराठी सिनेसृष्टीतले आघाडीचे फिल्ममेकर आहेत. त्यांच्यासोबत आमच्या पहिल्या सिनेमाची निर्मिती करताना आम्हांला आनंद होत आहे.”
दुनियादारी, तू हि रे, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरू, येरेयेरे पैसा अशा सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केलेल्या संजय जाधव ह्यांच्या लकी ह्या नव्या सिनेमाची घोषणा झाल्यावर आता सिनेमात स्टारकास्ट कोण असणार ह्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
फिल्ममेकर संजय जाधव म्हणतात, “सध्या आमचे संहितेवर काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर मगच सिनेमाच्या स्टारकास्टचा विचार आम्ही करू. सध्या सिनेमाविषयी जास्त बोलता येणार नाही.”
संजय जाधव ह्यांची खासियत आहे की, ते आपल्या सिनेमाच्या घोषणेच्यावेळीच त्याच्या रिलीजची डेटही दरवेळी जाहीर करतात. त्याप्रमाणे त्यांनी लकी चित्रपट 7 डिसेंबर 2018ला सिनेमागृहात झळकणार असल्याचे घोषित केले आहे.
‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिगदर्शित ‘लकी’ चित्रपट 7 डिसेंबर 2018 ला महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.