‘शुभ लग्न सावधान’ मधला सुबोध घाबरतो बायकोला !
लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते. त्यामुळेच तर कित्येकजण मंगलाष्टकामधील ‘सावधान’ या शब्दाचा सूचित अर्थ लावत लग्नापासून दूर पळतात.
पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित ‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमात अश्याच एका तरुणाची गोष्ट मांडण्यात आली असून, नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर मजेशीर टीझर लाँँच करण्यात आला. श्री राम आगाशे (कल्पनाकांत) यांच्या ‘मी बायकोला घाबरतो’ या धम्माल काव्यपंक्तीवर, प्रमुख भूमिकेत असलेल्या सुबोध भावेची उडालेली भंबेरी या टीझरमध्ये आपल्याला बघायला मिळते.
‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमाच्या टीझरमध्ये श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबियेदेखील आपल्याला पाहावयास मिळतात. एकंदरीत हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित जरी असला, तरी विवाह करण्यास अनुत्सुक असलेल्या एका प्रियकराची झालेली मजेशीर अवस्था या टीझरमधून प्रेक्षकांना दिसून येते. या सिनेमाचे कार्यकारी निर्माते अभय शेवडे यांच्या संकल्पनेतून हा अस्सल कौटुंबिक चित्रपट आकारास आला असून, त्याचे चित्रीकरण दुबई आणि इगतपुरी येथील नयनरम्य ठिकाणी झाले आहे. येत्या १२ ऑक्टोबर या शुभ मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या ‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटासाठी अरुंधती दाते, श्रीनिवास जांभेकर, विद्या संदीप तुंगारे व तुषार कर्णिक यांनी निर्मिती सहाय्य केले आहे. ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांच्याबरोबरच प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये या फ्रेश जोडीची अदाकारी असलेल्या, ‘शुभ लग्न सावधान’ सिनेमातल्या नायकाला लग्नाची इतकी का भीती वाटतेय? हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांना लागली नसेल तर नवलच !