शाळेतला जोशी “फोटोकॉपी”च्या कॉलेजात
शाळेतला मुकुंद जोशी आपल्या सगळ्यांच्या चांगलाच लक्षात आहे. शाळा सिनेमात त्याने साकारलेलं अल्लड वयातलं प्रेम आजही त्याच्या अभिनय क्षमतेची आठवण करून देते. अंशुमन जोशी या मुळच्या सोलापूरकर मुलाने शाळेतलं अवघं विश्वच आपल्या समोर उभं केलं. हा शाळेतला जोशी आत्ता आपल्याला कॉलेजात भेटणार आहे. नेहा राजपाल निर्मित आगामी फोटोकॉपी सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अंशुमन आपल्याला एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे.
विजय मौर्य यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून जुळ्या बहिणींची कथा आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणारआहे. या दोघींच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या सिनेमात चित्रित करण्यात आल्या आहेत. चेतन चिटणीस हा देखणा चेहरा या सिनेमातून आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला आहे. चेतन चिटणीस याच्यासोबतच वंदना गुप्ते, पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ओमकार मंगेश दत्त आणि डॉ आकाश राजपाल या दोघांनी मिळून या सिनेमाची कथा लिहिली आहे. सहा संगीत दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेली सहा गाणी असलेल्या सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फोटोकॉपी सिनेमातला अंशुमनचा नवा लूक प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल, यात मात्र शंका नाही.