Marathi News

‘विकून टाक’ मुळे समीर-हृषिकेश ची हॅट्रिक

RISHIKESH JOSHI & SAMEER PATIL
RISHIKESH JOSHI, SAMEER PATIL

आपल्या चोखंदळ अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते हृषिकेश जोशी. तर सामाजिक विषय विनोदी स्वरूपात प्रेक्षकांसमोर मांडण्याचे कौशल्य असलेले दिग्दर्शक समीर पाटील आता ‘विकून टाक’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.
दिग्दर्शक म्हटले, की चित्रपटामध्ये नवीन प्रयोग करणे हे आलेच. असाच एक नवीन प्रयोग समीर पाटील यांनी ‘विकून टाक’ या चित्रपटातून केला आहे. तो म्हणजे नेहमी विनोदी भूमिका साकारणारे हृषिकेश जोशी आता चक्क खलनायक बनून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘विकून टाक’ चित्रपटात हृषिकेश जोशी यांनी एक नकारात्मक भूमिका साकारली आहे. समीर पाटील आणि हृषिकेश जोशी यांचा विकून टाक हा हॅट्रिक चित्रपट आहे. या पूर्वी या दोघांनी पोस्टर बॉईज आणि पोस्टर गर्ल या चित्रपटात एकत्र काम केले होते. विकून टाक चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी तिसऱ्यांदा सोबत दिसणार आहे.

या चित्रपटातील भूमिकेबद्दल हृषिकेश जोशी म्हणतात, ” ‘विकून टाक’ या सिनेमात मी विठ्ठल डोंगरे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. जो मुकुंदच्या म्हणजेच नायकाच्या आयुष्यातले संकटांना कारणीभूत असतो. मुकुंदच्या समस्या वाढवून त्याचा फायदा आपल्याला कसा होईल? याचाच प्रयत्न हा विठ्ठल करत असतो. तसे पाहिले तर ही माझी खरी नकारात्मक भूमिका आहे”. तर समीर पाटील सोबत तिसऱ्यांदा काम करण्याच्या अनुभवाबद्दल हृषिकेश सांगतात, “मी आणि समीरने या आधी दोन चित्रपटांमध्ये सोबत केले असून विकून टाक च्या निमित्ताने आम्ही तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहोत. समीर आणि मी पक्के मित्र असल्यामुळे आम्हाला एकत्र काम करणे सोपे जाते आणि एकमेकांना काय अपेक्षित आहे. हे आम्हाला कळते. या चित्रपटामध्ये समीरने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असल्यामुळे माझ्यावर ओरडण्याची आणि हुकूमत गाजवायची एक संधी समीरने सोडलेली नाही.”

शिवराज वायचळ, चंकी पांडे, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘विकून टाक’ हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. विवा इनएन प्रॉडक्शन, उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि समीर पाटील दिग्दर्शित ‘विकून टाक’ या चित्रपटाचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट राजेंद्र वनमाळी असून सिद्धेश्वर एकांबे यांची कथा आहे. तर चारुदत्त भागवत, समीर पाटील यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button