‘लपाछपी’च्या अंगाईला लाभला रेखा भारद्वाज यांचा आवाज
मराठी सिने संगीताच्या आकर्षणाने हिंदीतील सुप्रसिद्ध गायक-गायिका मराठीत गाताना दिसून येत आहे, ‘ईश्कीया’ फेम हिंदीच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका रेखा भारद्वाज या देखील त्याला अपवाद नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या ‘लपाछपी’ या सिनेमातील अंगाईला त्यांचा आवाज लाभला आहे. ‘एक खेळ लापाछपीचा…’ असे बोल असलेल्या या अंगाई गीताचे भारद्वाज स्टुडियोमध्ये, नुकतेच रेखाजीच्या आवाजात रेकॉर्डींग करण्यात आले.
मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील आणि वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट आणि सुर्यवीरसिंग भुल्लर यांची निर्मिती असलेला हा हॉंरर सिनेमा असून, याचे दिग्दर्शन लेखन विशाल फुरिया यांनी केले आहे. तसेच दिग्दर्शक विशाल फुरिया आणि विशाल कपूर या जोडीने सिनेमाचे लेखन केले आहे. ‘लपाछपी’ सिनेमातल्या या अंगाई गाण्याच्या मूळ गायिका नंदिनी बोरकर जरी असल्या तरी रेखाजींच्या आवाजातील जादू या गीताला लाभली असल्यामुळे, ही अंगाई श्रोत्यांसाठी वेगळीच अनुभूती देणार आहे. स्वयेश्री शसीन वर्धावे यांनी ही अंगाई लिहिली असून, रंजन पटनाईक, टॉनी बसुमातरी आणि उत्कर्ष धोटेकर या तिघांनी त्याला ताल दिला आहे. ‘लपाछपी’ या हॉरर चित्रपटातील हे अंगाई गीत असल्यामुळे यात भय दाखवण्याचा प्रयत्न या तिघांनी केला आहे. पूजा सावंतची मध्यावर्ती भूमिका असलेल्या या सिनेमात उषा नाईक, अनिल गावस आणि विक्रम गायकवाड या कलाकरांचीदेखील भूमिका असून, येत्या १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.