लकी सिनेमाचे टायटल ट्रॅक झाले रिलीज, पहिल्यांदाच एकत्र आले सई,तेजस्विनी, सिध्दार्थ आमि उमेश !
बी लाइव्ह प्रस्तूत, लकी सिनेमाचे टायटल ट्रॅक नुकतेच एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले. अभय महाजन-दिप्ती सती ह्या लकी कपल सोबतच सिनेमाचे निर्माते सुरज सिंग, दिपक पांडुरंग राणे, दिग्दर्शक संजय जाधव, गायक अमितराज आणि सुपरस्टार सई ताम्हणकर-सिध्दार्थ जाधव ह्यावेळी उपस्थित होते. पूण्यात झालेल्या ह्या सोहळ्याला पूणेकरांची अभूतपूर्व गर्दी लोटली होती.
दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “ह्या गाण्याच्या लाँचला खूप भारी प्रतिसाद मिळाला. टाळ्या,शिट्या आणि जल्लोषाने खच्चून भरलेल्या मॉलमध्ये गाण्याचे लाँच करण्याचा अनुभव अद्भूत होता. प्रेक्षकांनी माझ्यावर आत्तापर्यंत जे प्रेम केले आहे, त्याचा मी ऋणी आहे. आणि मला विश्वास आहे, लकी सिनेमाला ते असाच भरभरून प्रतिसाद देतील.”
निर्माते सुरज सिंग म्हणाले, “आम्ही खूप लकी आहोत की, आमच्या सिनेमाला रिलीज होण्याअगोदर रसिकांचे एवढे प्रेम मिळते आहे. ह्या प्रेमाने आता हुरूप आला आहे. लकी सिनेमाचे हे टायट्रल ट्रक रसिकांसाठी एक व्हिज्युअल ट्रिट आहे.”
यो(सचिन पाठक) ने लिहीलेल्या ह्या गाण्याला अमितराज ह्यांनी संगीतबध्द केलंय आणि गायलंय. सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सिध्दार्थ जाधव आणि उमेश कामत ह्यांच्यावर गाणे चित्रीत झाले आहे. मराठी सिनेसृष्टीतले हे चार सुपरस्टार एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सई ताम्हणकर ह्याविषयी म्हणते, “मी खूप लकी आहे, की संजयदादाच्या ब-याच सिनेमांचा मी हिस्सा होऊ शकले. लकी सिनेमाचा मी हिस्सा आहे, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.”
सिध्दार्थ जाधव म्हणतो, “दादांच्या सिनेमाचा हिस्सा होणे, मला नेहमीच आवडते. येरे येरे पैसा नंतर तेजस्विनी पंडित आणि उमेश कामत ह्यांच्यासोबत पून्हा एकदा ह्या गाण्यानिमीत्ताने काम करता आलंय. आमच्यासाठी हे जणू एक वर्षानंतरचे ‘रियुनीयन’ असल्यासारखे आहे.”
तेजस्विनी पंडित म्हणते, “फक्त ‘येरेयेरे पैसा’च नाही तर सई आणि माझ्यासाठीही ‘तूहिरे’नंतरचेही हे रियुनियन आहे. ‘तोळा तोळा’नंतर चार वर्षानी मी आणि सई एका गाण्यातून पून्हा एकदा एकत्र दिसणार आहोत. आम्ही लकी आहोत, की आम्ही सगळेच संजयदादाच्या कुटूंबाचा हिस्सा आहोत.”
उमेश कामत म्हणतो, “लकी सिनेमा सुरू होण्याच्याअगोदरच मी एका व्हिडीयोतून म्हणालो होतो, की मी ‘लकी’ असणार आहे. मी खरंच स्वत:ला लकी समजतो की, संजयदादासोबत मला पून्हा पून्हा काम करता येतं. सई, सिध्दू, तेजस्विनी आणि माझ्यावर चित्रीत झालेलं हे गाणे नक्कीच तुम्हांला आवडेल.”
‘बी लाइव्ह प्रॉडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेल्या, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.