येत्या १४ जुलै ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या ‘लपाछपी’ या सिनेमाने सध्या लंडन गाठले आहे. लंडन येथे होत असलेल्या लंडन इंडियन फिल्म फेस्टिवलसाठी या सिनेमाला आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे सातासमृद्रापार पोहोचलेल्या मराठी चित्रपटांच्या यादीत सामील झालेला हा सिनेमा लंडन फिल्म फेसिवलमध्ये देखील झळकला आहे.
मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील व विना पाटील आणि वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट व सुर्यवीरसिंग भुल्लर निर्मित ‘लपाछपी’ या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले आहे. तसेच याचे लेखन सिनेमाचे दिग्दर्शक विशाल फुरिया आणि विशाल कपूर या दोघांनी मिळून केले आहे.
अभिनेत्री पूजा सावंतवर आधारित असलेल्या या सिनेमाची अंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी कौतुकास्पद आहे. लंडन फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी या सिनेमाने अनेक आंतरराष्ट्रीयफिल्म फेस्टिवल्समध्येदेखील आपले नशीब आजमावले आहे. ज्यात विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण १५ पुरस्कारांवर या सिनेमाने बाजी मारली असून, हडसन,ओहायो येथील इंटरनेशनल हॉरर हॉटेलचा पुरस्कार देखील ‘लपाछपी’ या चित्रपटाने आपल्या नावे केला आहे. शिवाय २०१६ साली माद्रिद येथे झालेल्या माद्रिद इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये या चित्रपटाला पाच नामांकने देण्यात आली होती. ज्यात पूजाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत निवड करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गतवर्षीच्या ब्रुकलीन फिल्म फेस्टिवल्समध्ये या चित्रपटाला स्पिरीट अवार्डने सन्मानित करण्यात आले होते.
हॉरर कथानकावर आधारित असलेल्या ह्या मराठी सिनेमाची दर्जेदार मेजवानी लवकरच महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांनी चाखायला मिळणार आहे.