रणबीरचा लूक पाहून संजयला स्वत:ला आरशात पाहिल्याचा भास झाला !
संजू चित्रपट सध्या हाऊसफूल होतोय. दोन आठवड्यांनंतरही गर्दी खेचणा-या ह्या सिनेमातले रणबीर कपूरचे 8 लूक्स सध्या गाजतायत. संजूचे हे आठ लूक्स डिझाइन करणारे शिल्पकार आहेत, सुरेंद्र साळवी – जितेंद्र साळवी हे दोघे भाऊ.
संजू चित्रपटात रणबीरसोबतच परेश रावल, सोनम कपूर, अनुष्का शर्मा ह्यांचा लूक खूलवण्यामागे सूध्दा सुरेंद्र-जितेंद्र ह्या भावांचा सिंहाचा वाटा आहे. ह्या दोन भावंडांनी संजूच्या मुख्य स्टारकास्टासाठी वीग डिझाइन केले आहेत.
सुरेंद्र आणि जीतेंद्र साळवी ह्यांनी कुली, खुदा गवाह, बाजीराव-मस्तानी, 3 इडियट्स, अग्निपथ, बाहूबली, पद्मावत, 102 नॉट आउट अशा चारशेहून अधिक चित्रपटासाठी वीग डिझाइन केले आहेत.
सूत्रांच्या अनुसार, बॉलीवूडमध्ये गेली 38 वर्ष काम करणा-या सुरेंद्र साळवी आणि 16 वर्ष काम करणा-या जीतेंद्र साळवी ह्यांनी बॉलीवूडच्या 95 टक्के सिनेमांसाठी वीग डिझाइन केले आहेत. कुली सिनेमापासून सुरू झालेला हा सिलसिला आता संजूपर्यंत अविरत सुरू आहे. सिनेमाच नाही तर एड फिल्मसाठीही ह्या भावांची ‘नॅचरल हेअर’ ही कंपनी विग डिझाइन करते.
सुरेंद्र साळवी ह्याविषयी म्हणतात, “काल्पनिक आणि ऐतिहासिक व्यक्तिंसाठी विग डिझाइन करणे सोपे असते. पण एखाद्या लिविंग लिजेंडसाठी लूक डिझाएन करणे हे आव्हानात्मक असते. पण मी सुनील दत्त आणि संजय दत्त ह्या दोघांसोबत काम केल्याने मला दोघांच्याही केसांचे स्ट्रक्चर माहित होते. त्यामूळे वीग डिझाइन करणे माझ्यासाठी सोपे झाले. आम्ही रणबीरसोबत 15 ते 20 लूक्स ट्राय केल्यावर त्यातले आठ लूक्स राजू हिरानींनी फायनल केले.”
जीतेंद्र साळवी म्हणतात, “एक दिवस संजय दत्त सेटवर आले होते. आणि त्यांनी रणबीरचा लूक पाहून ‘क्षणभर मी स्वत:ला आरशात पाहिल्याचा मला भास झाला’ असं म्हटलं आणि आम्हांला आमच्या कामाची पोचपावती मिळाली.”