Marathi News
‘मी माझे नाव जपतो, तू तुझे नाव जप’ असा बाबांनी दिला होता सल्ला- रितेश देशमुख
बॉलीवूड क्षेत्रात दीर्घकाळ स्थिरावलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने वडील विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. महराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच राज्यातील आदर्श नेत्यात गणले जाणारे दिवंगत विलासराव देशमुख यांचा सुपुत्र असल्याचे माझे भाग्य असल्याचे रितेशने ‘विकता का उत्तर’ या शोमध्ये सांगितले. स्टारप्रवाह वरील या कार्यक्रमाचे रितेश सूत्रसंचालन करत असून, या कार्यक्रमाच्या एका भागात रितेशला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना रितेशने वडील विलासराव देशमुखांबद्दल दाटून आलेल्या भावनेला वाट करून दिली.
मी लहानपणापासून राजकारण पाहत आलो आहे, बाबा सतत कोणत्या ना कोणत्या सभेसाठी व्यस्त असायचे, घरी सतत राजकारणी लोकांची वर्दळ असायची. त्यामुळे मी भविष्यात अभिनयक्षेत्रात काम करेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. खरे सांगायचे तर मी, आर्किटेक्ट आहे. मात्र एकदा रामोजी टेलिफिल्म्सकडून मला ‘तुझे मेरी कसम’ साठी विचारण्यात आले. त्यांची ही ऑफर्स स्वीकारायची कि नाही याचा विचार करायला मी १० दिवस त्यांच्याकडून मागितले. बाबा विलासराव देशमुख त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांची प्रतिमा जपणे देखील मला महत्वाचे वाटले. बाबांना मी सिनेमात काम करू का असे सांगायचे माझे धाडस होत नव्हते, तसेच कामात अतिव्यस्त असल्याने त्यांची भेट घेण देखील मला या दिवसात अशक्य होतं. मात्र अखेरीस मी बाबांना फिल्मविषयी सांगितले, काम करू का असे विचारले. त्यावेळी बाबांनी हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे असे सांगत मला प्रोत्साहन दिल्याचे रीतेश सांगतो.
दरम्यान हा सिनेमा करताना प्रेक्षक ‘मुख्यमंत्र्यांचा मुलगा’ म्हणून मला ओळखतील, याची जाणीव रितेशला होती, त्यामुळे सिनेमा चालला नाही तर मुख्यमंत्र्यांच्या मुलाला अभिनय येत नाही अशी टीका होण्याची शक्यता जास्त होती! रितेशने ही भीती देखील विलासराव देशमुख यांना बोलून दाखवली. त्यावेळी विलासराव देशमुख यांनी माझा मुलगा नव्हे तर स्वतःची एक विशेष ओळख बनवण्याचा सल्ला रितेशला दिला. ‘काही होणार नाही, तू तुझे नाव जप, मी माझे नाव जपतो’ हे वडिलांचे वाक्य मी आजही इमान – ए -इतबारे पाळत असल्याचे रितेश सांगतो.
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या खुमासदार आणि दिलखुलास गप्पांमध्ये खिळवून ठेवणारा रितेश देशमुख ‘विकता का उत्तर’ च्या रविवारच्या भागात बाबांबद्दल मनमोकळेपणाने बोलताना दिसणार आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असणारे विलासराव देशमुख आणि त्यांची यशस्वी कारकीर्द लोकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या पाश्चात विलासरावांचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांचे गुणगान गाताना दिसून येतात. विलासराव देशमुखांना स्मरण करणारा या कार्यक्रमाचा हा विशेष भाग आज प्रेक्षकांना स्टार प्रवाहवर संध्याकाळी ७.३० वाजता पाहायला मिळेल.